जांबवंताचे वस्तीस्थान असलेल्या त्या भयंकर निबिड अरण्याचे वर्णन करताना कृष्णदयार्णव पुढे म्हणतात-
भुभुकार देती वानरभार । फूत्कारकरिती महाविखार।
कोकिळांचे पंचम स्वर । मत्त मयूर नाचती ।
ढोलीं घुघाती दिवाभीत । वटवाघुळा कळकळित ।
स्वेच्छा पिंगळे किलबिलित । किलकिलत कळविंक ।
राक्षस गर्जती भयंकर । सिंहनाद करिती घोर ।
भूत प्रेत यक्षिणी क्रूर । पिंग झोटिंग वेताळ ।
भूतें नाचती नग्नोन्मत्त । विशाळ विकराळ महाप्रेत ।
शाकिनी डाकिनी खांकात । भीम गर्जत वनचंडी ।
सिंह ऋक्षव्याघ्र वृक । वाराह गज गवाक्ष भल्लूक ।
तरस चमरी खङ्ग जंबुक । महाभयानक श्वापदें ।
ऐसिये दुर्गम वनोदरिं । ऋक्षपदवी लक्षित हरि ।
रिघाला जाम्बवताचे विवरिं । तेंहि चतुरिं परिसावें ।
त्या निबिड अरण्यात वानर भुभुत्कार देत या झाडावरून त्या झाडावर उडय़ा मारत होते. महाविषारी साप फुत्कार करीत सरपटत होते. कोकिळा पंचम स्वरात गायन करीत होत्या. मोर मत्त होऊन नाचत होते. घुबडे ढोलींमध्ये दडली होती. वटवाघळे फांद्यावर उलटी लटकली होती. पिंगळे किलबिलत होते. राक्षस मोठय़ाने आरोळय़ा ठोकत होते. सिंह गर्जना करीत होते. भुते, प्रेते, क्रूर यक्षिणी, पिंग, झोटिंग, वेताळ यांची भीती आसमंतात पसरली होती.
अशा वनात नग्न उन्मत्त भुते येथे नाचतात, विशाल विक्राळ महाप्रेते वावरतात, शाकिनी डाकिनी खिंकाळतात अशी भीती मनाला वाटत होती. सिंह, वाघ, रानडुक्कर, हत्ती, अस्वले, तरस, कोल्हे, लांडगे इत्यादी महाभयंकर श्वापदे त्या वनात फिरत होती. अशा दुर्गम वनाच्या उदरात असलेल्या जांबवंताच्या गुहेत श्रीहरीने प्रवेश केला, याची कथा आपण आता ऐका असे महामुनी शुकदेव राजा परिक्षितीला सांगतात.
बिळामाजी आस्वलमार्ग । देखोनि थोकला नागरवर्ग।
म्हणती मणीचा प्रसंग । येथोनि लाग राहिला ।
हें ऐकोनि पंकजपाणि । नागरजनासि बोले वाणी ।
जंववरी प्राप्त नोहे मणि । द्वारकाभुवनीं तंव न वचें ।
तें परिसूनि समस्त जन । म्हणती काय हा आग्रह कोण ।
विवरिं रिघोनि द्यावा प्राण। येवढें निर्वाण किमर्थ ।
एक म्हणति सत्राजिता । सांगोनि प्रसेन मरणवार्ता ।
शस्त्रेsं वस्त्रें भूषणें देतां । दुर्यश माथां मग कैंचें ।
ऐकोनि म्हणे पद्मनाभ । जंववरी मणीचा नोहे लाभ ।
तंव दुर्यशकाळिमाराहुबिंब । जडलें स्वयंभ वदनाब्जा।
यालागीं प्रवेशेन मी विवरिं । समस्तीं रहावें बाहेरिं ।
ऐसें म्हणोनियां श्रीहरी । बिळामाझारिं प्रवेशला ।
अस्वलाच्या पदचिन्हांचा मागोवा घेत कृष्ण व यादव चालले होते. एका गुहेमध्ये अस्वलाने प्रवेश केला असावा असे त्या पावलांच्या खुणांवरून दिसत होते. बहुतेक स्यमंतकमणी घेऊन अस्वल या गुहेत शिरले असावे असा कयास लोकांनी केला. तेव्हा श्रीकृष्ण त्या यादवांना म्हणाला-जोपर्यंत स्यमंतकमणी मिळत नाही तोवर मी द्वारकेत प्रवेश करणार नाही. ते ऐकून सगळे लोक म्हणाले-हे श्रीकृष्णा! हा काय खुळा आग्रह!
Ad. देवदत्त परुळेकर








