प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराचा विकास आराखडा तयार करत असताना, कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठावरील, ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा स्वरूपाचे शहर आहे. याचे भान ठेवूनच कोल्हापूर शहराचा विकास आराखडा तयार केला जात आहे अशी माहिती उपसंचालक नगर रचनाकार (डी. पी. युनिट) धनंजय खोत, यांनी दिली. बिल्डो 2022 प्रदर्शनात आयोजित केलेल्या दुसऱया दिवशी, कोल्हापूर शहर तिसरा विकास आराखडा या विषयावर ते बोलत होते. नियोजित कोल्हापूर शहर विकास आराखडय़ाचे सविस्तर सादरीकरण त्यांनी यावेळी केले. तसेच नगर रचना विभागातील अधिकारी रमेश लाड यांनीही सदरीकरणामध्ये सहभाग घेतला.
तिसरा विकास आराखडा तयार करत असताना कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणच्या भौगोलिक, नैसर्गिक परिस्थितीचा विचार केला जात आहे. शहराची वाढती लोकसंख्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी, नगर रचना विभागाचा इतिहास आणि वेळोवेळी झालेला विकास, शहरातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे यांचा विचार केला जात आहे. विकास आराखडय़ाचे प्रत्यक्ष कामकाज करीत असताना विकास आराखडय़ाचे दोन टप्पे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचा जमीनीचा वापर आणि प्रस्तावित जमीन वापर. या दोन पातळीवर सविस्तर अभ्यास करून नवीन आराखडा तयार केला जात आहे. नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर त्याचा योग्य प्रकारे अंमलबजावणी केला जाईल याचीही त्यांनी ग्वाही दिली. सादरीकरणानंतर विचारलेल्या प्रश्नांना धनंजय खोत यांनी उत्तरे दिली.
विकास आराखडा साकारत असताना असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स असोसिएशनचे मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे खोत यांनी आवर्जून सांगितल. दुसऱया व्याख्य़ानात दक्षिण एशिया एक्सीस फसाडचे प्रादेशिक संचालक के. आर. सुरेश यांनी, इन्स्पायर्ड फसाड डिझाईन मटेरियल ऍन्ड केस स्टडी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी धनंजय खोत आणि रमेश लाड यांचा सत्कार करून प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी स्वागत व आभार मानले. आज सायंकाळी 5.30 वाजता बिल्डो प्रदर्शनस्थळावर आयकॉन स्टीलचे टेक्निकल प्रॉडक्शन हेड राजेंद्र त्रिपाठी यांचे प्रेझेंटेशन होणार आहे.









