दोषींच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिल्कीस बानो प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेला आव्हान देणाऱया याचिकांवर 13 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
2002 च्या गुजरात दंगलींदरम्यान सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या बिल्कीस बानो यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुन्हेगारांच्या मुक्ततेचा निर्णय घेण्याची जबाबदारी गुजरात सरकारवर सोडण्याच्या न्यायालयाच्या आदेशाविरोधात त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचबरोबर बिल्कीस यांनी सर्व 11 दोषींची शिक्षा पूर्ण होण्याआधीच झालेल्या मुक्ततेच्या विरोधातही याचिका सादर केली आहे.
गुजरात सरकारने बिल्कीस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करणाऱया 11 दोषींना शिक्षेतून सूट दिली होती. आजीवन कारावासाला तोंड देणाऱया परंतु 14 वर्षे तुरुंगात काढलेल्या कैद्यांची लवकर सुटका करण्याचा निर्णय 1992 च्या धोरणानुसार घेतला होता, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मुक्तता करण्यापूर्वी राज्य सरकारची मंजुरी मिळविली होती. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली होती. यामुळे केंद्र सरकारची मंजुरी मिळविणे आवश्यक ठरले होते.









