प्रतिनिधी / बेळगाव
परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा एकदा सुगी हंगामाकडे वळला आहे. काढणी केलेल्या माळरानावर पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बियाणांच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. विशेषकरून माळरानावर मका, ज्वारी व बाजरीची पेरणी करताना शेतकरी दिसत आहेत.
सुगी हंगामातील बटाटा, रताळी, भुईमूग व सोयाबीनच्या काढणीनंतर शिवारात बाजरी, मका व ज्वारीची पेरणी करताना दिसत आहेत. मात्र याच बियाणाच्या बाजरीने आता शंभरी पार केली आहे. त्यामुळे बियाणासाठी शेतकऱयांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. तर काही शेतकरी बियाणाच्या बाजरीचा अधिक दर पाहून मका व ज्वारीची मागणी करत आहेत. सर्रास 60 ते 70 रुपये किलो असणाऱया बाजरीचा दर शंभर रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे शेतकऱयांना अधिक पैसे देऊनच बाजरी विकत घ्यावी लागत आहे.
सध्या बियाणाच्या बाजरीचा दर 110 रुपये तर मका 30 रुपये तर ज्वारीचा दर प्रति किलो 45 ते 50 रुपयापर्यंत आहे. सुगी हंगामातील बटाटा, रताळी, भुईमूग व सोयाबीनची काढणी केलेल्या शिवारात मका, बाजरी व ज्वारीची पेरणी सुरू आहे. त्यामुळे बियाणांना मागणी वाढली आहे. परतीचा पाऊस दमदार झाल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजरी, मका व ज्वारी पेरणीला पूरक वातावरण निर्माण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.









