रुग्णांची हेळसांड थांबण्याची गरज : कारभारात सुधारणेची आवश्यकता
प्रतिनिधी / बेळगाव
एकेकाळी गरिबांचे इस्पितळ अशी ओळख असणाऱया पूर्वीच्या सिव्हिल हॉस्पिटलचे बिम्स झाल्यानंतर पुरती वाट लागली आहे. गलेलठ्ठ पगाराचे डॉक्टर, अधिकाऱयांचा भरणा असूनही उपचारासाठी जाणाऱया सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व गरिबांच्या पदरी निराशाच येते. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्वतः पीपीई किट घालून तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यांची मात्रा बिम्सला लागू पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बिम्सचा विषय आला की जिल्हाधिकाऱयांसह बहुतेक अधिकारी नरमाईची भूमिका घेतात. प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिश्वास यांनी बिम्स प्रशासनाबद्दल कठोर भूमिका घेतली होती. रमेश जारकीहोळी पालकमंत्री असतानाही सिव्हिलला वारंवार भेट देऊन अधिकाऱयांना ताळय़ावर आणत होते. जिल्हय़ात पाच मंत्री असूनही कोणाचीच भीती बिम्सच्या अधिकाऱयांना राहिली नाही.
सोशल मीडियावर बिम्सच्या गैरकारभाराबद्दल चर्चा वाढताच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बिम्सला भेट दिली आहे. त्यानंतर अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांना चार दिवसांत कारभार सुधारा, नाही तर कारवाईला तयार रहा, अशी तंबी दिली आहे. बिम्सच्या भेटीदरम्यान आपण इस्पितळात आलो आहोत की एखाद्या जत्रेत, असा प्रश्न उपस्थित करून गेंडय़ाच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत.
लक्ष्मण सवदी यांच्या बिम्स भेटीनंतर तेथील प्रस्थापितांना धक्का देऊन सेवाभावी वृत्तीने काम करणाऱयांना संधी द्यावी, अशी मागणी वाढली आहे. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्या कारभाराबद्दल बहुतेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी तर उपमुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात बिम्सच्या अधिकाऱयांची खरडपट्टी काढली आहे.
आता वेगवेगळय़ा संघटनांनी बिम्समधील प्रस्थापितांना बदला, अशी मागणी केली आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात पाच किलो सोने चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी तातडीने चार पोलीस अधिकाऱयांची तडकाफडकी बदली केली. इथे तर रोज सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांना तातडीने बदला, अशी मागणी वाढली आहे. त्यामुळे बिम्समधील भोंगळ कारभारावर संताप वाढत चालला आहे.
म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्मयात घालून बिम्समध्ये काय परिस्थिती आहे? याची पाहणी केली आहे. बेड उपलब्ध असताना उपचारासाठी येणाऱया गरीब व सर्वसामान्यांना बेड नाही, अशी उत्तरे देत त्यांना हाकलण्याचे प्रकार अनेक वेळा घडले. यासंबंधी जबाबदार अधिकाऱयांना विचारले असता, ‘तुम्ही काय बोलायचे ते जिल्हाधिकाऱयांशी बोला’ असे सांगून उर्मटपणाचे दर्शन घडविले आहे. ऑक्सिजनशिवाय बिम्समध्ये अनेक जण दगावले आहेत. या सर्व गैरकारभारावर पांघरुण घालण्यात येत आहे.









