गर्दीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना रोखण्यासाठी लस घ्यायची की लसीकरणासाठी गर्दी करून कोरोनाला निमंत्रण द्यायचे…. हे आता नागरिकांनीच ठरविणे महत्त्वाचे आहे. कोरोना रोखण्यासाठी अनेक नियम करणाऱया प्रशासनाने आता लसीकरणासाठी होणाऱया गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे.
लवकरच महाविद्यालये सुरू होतील. काही ठिकाणी हळूहळू मर्यादित स्वरुपात कार्यक्रमही सुरू झाले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते अथवा मेसेज दाखवावा लागतो. त्यामुळे लसीकरणासाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. शिवाय तिसरी लाट येण्यापूर्वी आपण लस घ्यावी, यासाठी नागरिक पायपीट करत आहेत.
मात्र, बऱयाच लसीकरण केंद्रांवर नो स्टॉकचा फलक लागला आहे. त्यामुळे सकाळपासून थांबलेल्या नागरिकांची निराशा होत आहे. हे सर्व नागरिक लसीकरणासाठी पुन्हा बिम्समध्ये येत आहेत. बिम्समध्ये माईकद्वारे वारंवार लसीची उपलब्धता जाहीर केली जाते. परंतु नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत लस मिळालीच पाहिजे, असे वाटत असल्याने ते तेथे गर्दी करून थांबत आहेत.
या गर्दीमुळे सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडत आहे. अशाच पद्धतीने गर्दी होत राहिली तर कदाचित पुन्हा कोरोना डोकेवर काढण्याची शक्मयता नाकारता येत नाही, हे वारंवार निदर्शनास आणून देऊनसुद्धा नागरिकांकडून शिस्तीचे पालन केले जात नाही. आता जिल्हा प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलून उपाययोजना करणे आवश्यक आहे.









