केवळ एका दिवसात पॉझिटिव्हचा निगेटिव्ह अहवाल आल्याने खळबळ : याला जबाबदार कोण?
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीने साऱया जगाला हैराण केले आहे. महामारी थोपविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळे नियम जारी करण्यात येत आहेत. आता परराज्यात जाणाऱयांसाठी व परराज्यांतून बेळगावात येणाऱयांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी गर्दी होऊ लागली आहे. तशातच रिपोर्टमध्ये मोठा घोळ सुरू आहे.
बिम्समध्ये पॉझिटिव्ह आलेल्या इसमाचा केवळ एक दिवसाच्या फरकाने खासगी इस्पितळातील चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे कोणता अहवाल खरा व कोणता खोटा? असा प्रश्न संबंधितांसमोर उपस्थित झाला आहे. सरकारी यंत्रणेकडे या घोळासंबंधी उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून ठोस असे उत्तर मिळाले नाही.
व्यवसायानिमित्त गोव्याला जाण्यासाठी गणपत गल्ली येथील एका 55 वषीय रहिवाशाने 28 जून रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वॅब तपासणीसाठी दिले. बिम्समधील अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र प्रत्यक्षात त्यांना कोरोनाची कसलीच लक्षणे नव्हती. म्हणून संशय दूर करून घेण्यासाठी दुसऱयाच दिवशी दि. 29 जून रोजी त्यांनी खासगी इस्पितळात आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी स्वॅब दिले.
खासगी इस्पितळातून आलेला अहवाल पाहून त्यांना धक्काच बसला. कारण तो अहवाल निगेटिव्ह होता. सरकारी लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर खासगी लॅबचा अहवाल निगेटिव्ह, अशी स्थिती केवळ एक दिवसात बदलू शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परराज्यात जाण्यासाठी व परराज्यांतून बेळगावात येण्यासाठी आरटीपीसीआर तपासणी सक्तीची केली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व व्यवहार, व्यापार, उद्योग, व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे आर्थिक चक्रही मंदावले होते. आता व्यवसायानिमित्त कोल्हापूर, सांगली किंवा गोव्याला जाणाऱया व्यापाऱयांसाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल सक्तीचा आहे. त्यासाठी तपासणी करायला गेले असता असा घोळ घातला जात आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









