मुख्यमंत्र्यांच्या दौऱयामुळे साफसफाईसाठी हालचाली सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप प्रदीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बिम्समधील गैरकारभार व गैरसोयींमुळे ते ठळक चर्चेत होते. मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱयाआधीच साफसफाईच्या हालचालींनाही सुरुवात झाली असून आता तरी सर्वसामान्य, गरीब रुग्णांना बिम्समध्ये उपचार मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बिम्समधील भोंगळ कारभाराबद्दल जोरदार टीका सुरू झाली होती. सोशल मीडियावर तर बिम्स प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे कोरोनाबाधितांच्या उपचारात कसा व्यत्यय येतो आहे, बेड नाही, औषधे नाहीत अशी उत्तरे देत गरीब व सर्वसामान्य रुग्णांना बिम्सच्या दारातूनच माघारी पाठविले गेले, याबाबत जोरदार टीका झाली होती. कोरोनामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या बाधितांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी गेलेल्यांना धक्कादायक अनुभव येत होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्वतः पीपीई किट परिधान करून कोविड वॉर्डमध्ये प्रवेश केला होता. याबरोबरच इतर सर्व विभागांना भेटी देऊन तेथील गैरसोयी, अस्वच्छता आदी स्वतःच्या डोळय़ांनी पाहिले होते.
बिम्समधील अधिकारी गेंडय़ाच्या कातडीचे आहेत, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, कारभारात सुधारणा झाली नाही तर कारवाईला सामोरे व्हा, असा इशाराही सवदी यांनी दिला होता. अनेक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, वेगवेगळय़ा संस्थांच्या पदाधिकाऱयांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे डॉ. विनय दास्तीकोप यांच्या कारभाराबद्दल तक्रारी केल्या होत्या.
त्यामुळे बिम्समधील कारभाराचा आढावा घेण्याबरोबरच जिल्हय़ातील कोरोना परिस्थितीवर अधिकाऱयांची बैठक घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री बेळगावला येणार आहेत. त्याआधीच डॉ. विनय दास्तीकोप हे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. 2 जून ते 1 जुलैपर्यंत 30 दिवस ते रजेवर गेल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या शरीर रचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उमेश कुलकर्णी यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. बिम्सच्या स्थापनेपासून आजवर इतकी बदनामी कधीच झाली नव्हती. गेल्या महिन्याभरात निष्क्रियपणामुळे बिम्स ठळक चर्चेत आहे. 800 हून अधिक बेड्सची क्षमता असूनही केवळ 300 ते 350 कोरोनाबाधितांवर या इस्पितळात उपचार केले जात आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक जणांवर उपचाराविना मृत्यू ओढविला. खासगी इस्पितळांचा खर्च मध्यमवर्गीय, गरीब व सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त जण सिव्हिल हॉस्पिटलवरच विसंबून होते. मात्र आपल्यावरील जबाबदारी पार पाडण्यात बिम्स प्रशासन अपयशी ठरले आहे.
आता बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप हे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील परिस्थिती सुधारण्यासाठी उपचारासाठी येणाऱया सर्वसामान्य रुग्णांवर विनाविलंब उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याची सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांच्या दौऱयानंतर आणखी काही घडामोडी घडण्याची शक्मयता आहे.









