ऑनलाईन टीम / नगर :
अचानक समोर आलेल्या बिबटय़ाला पाहून घाबरलेल्या महिलेचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील जाखुरी गावात घडली.
शीलाबाई लहानु पानसरे (वय 48) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीलाबाई पानसरे शनिवारी सायंकाळी आपल्या शेतात काम करत होत्या. दरम्यान, त्यांच्या समोर अचानक बिबटय़ा समोर उभा ठाकला. बिबटय़ाला पाहून भेदरलेल्या शीलाबाईंना त्याचवेळी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
संबंधित प्रकाराची माहिती वनविभागाच्या अधिकाऱयांना देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱयांना घेराव घालत मयताच्या कुटुबीयांना वनविभागाकडून मदत मिळण्याची मागणी केली. मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेला कोणतीही जखम नसल्याने ही मदत मिळणे कठीण असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.









