वनखात्याचे डीएफओ अँथोनी मरियप्पा यांची माहिती : सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ टाकणे धोकादायक : नऊ दिवसांत बिबटय़ाचा मागमूस नाही : रेसकोर्स सोडल्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
ट्रप कॅमेरे, आधुनिक तंत्र, हनीटॅप, मुधोळ श्वान, प्रशिक्षित हत्ती पथक आणि शेकडो कर्मचाऱयांच्या माध्यमातून राबविलेल्या बिबटय़ा शोधमोहिमेला अखेर अपयश आले आहे. दरम्यान रविवारी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवून बिबटय़ाचा शोध घेण्यात आला. मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. मागील 9 दिवसांत बिबटय़ाबाबत एकही पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स परिसरातून निघून गेला आहे, असे वनखात्याने स्पष्ट केले आहे. रविवारी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान वनखात्याचे डीएफओ अँथोनी मरियप्पा यांच्याशी बिबटय़ाबाबत ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद…
बिबटय़ाबाबत सद्यपरिस्थितीत काय सांगाल?
-रविवारी बिबटय़ासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. वनखात्याचे 200 तर पोलीस खात्याच्या 100 कर्मचाऱयांनी रेसकोर्स परिसर पिंजून काढला. शिवाय मागील नऊ दिवसांत बिबटय़ाबाबत एकही पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स परिसरातून निघून गेला आहे. कॅमेरा ट्रप किंवा पाऊलखुणादेखील आढळल्या नाहीत. सर्व परिसराची छाननी करण्यात आली. शिवाय आठवडय़ात दोन कोम्बिंग ऑपरेशन राबवूनही बिबटय़ा आढळून आला नाही.
रेसकोर्समधीलच बिबटय़ा मंडोळी, बेळवट्टी भागात गेला आहे का?
-मंडोळी भागात बिबटय़ा नजरेला पडला असल्याची माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्याठिकाणी दाट झाडी आणि वनक्षेत्र आहे. शिवाय रेसकोर्समधून सावगाव, मंडोळी भागात जाण्यासाठी बिबटय़ाला ग्रीनबेल्ट आहे. त्यामुळे मंडोळी, बेळवट्टी भागात दिसलेला बिबटय़ा हा रेसकोर्समधीलच असू शकतो. रेसकोर्समधून बाहेर पडणाऱया मार्गावर ट्रप कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेर पडताना किंवा बाहेरून आत येताना बिबटय़ाची छबी कैद होते. मात्र मागील 9 दिवसांत बिबटय़ाची एकही छबी कैद झाली नाही. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स परिसरात नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो मूळ नैसर्गिक अधिवासात परतला आहे.
रेसकोर्समधील बिबटय़ाने बेळवट्टी, बाकनूर भागात दहशत माजविली आहे का?
मागील 9 दिवसांपासून रेसकोर्स परिसरात बिबटय़ा आढळून आला नाही. दरम्यान याचकाळात तो बेळवट्टी आणि बाकनूर भागात दिसून आला आहे. त्यामुळे हा एकच बिबटय़ा असू शकतो. रेसकोर्सच्या तिन्ही बाजूला दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे त्याला बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग मोकळा आहे आणि येथून तो सावगाव, मंडोळी मार्गे पुढे गेला आहे. ज्या दिवसापासून रेसकोर्स परिसरात बिबटय़ा नजरेला पडला नाही, त्या दिवसापासून मंडोळी, बेळवट्टी भागात निदर्शनास आला आहे. यावरून हा एकच बिबटय़ा असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय हा एकच बिबटय़ा सर्वत्र दहशत माजवत आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे.
30 दिवसांच्या कालावधीनंतरही बिबटय़ा मिळाला नाही, याबाबत काय सांगाल?
– सर्व कामे बाजूला ठेवून वनविभाग बिबटय़ाच्या मागावर होता. शिवाय गणेशोत्सवातही कर्मचारी रेसकोर्समध्ये तळ ठोकून आहेत. आपल्या जबाबदारीचे गांभीर्य ओळखून सर्व यंत्रणा बिबटय़ाच्या मागावर होती. प्रत्येक वन्यप्राण्याचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे वन्यप्राणी एक-दोन महिने शहराच्या दाट झाडी असलेल्या भागात राहू शकतात. या आधीही अनेक शहरात बिबटय़ा आल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय बिबटय़ा हा चपळ असल्याने परिस्थितीनुसार आपल्या हालचाली बदलतो. त्यामुळे तो आता मूळ अधिवासाच्या दिशेने निघाला आहे.
रविवारी हाती घेतलेली शोधमोहीम शेवटची होती का?
रविवारी राबविलेली शोधमोहीम शेवटची म्हणता येणार नाही. बिबटय़ा जोपर्यंत सापडणार नाही, तोपर्यंत रेसकोर्स परिसरात आठ ते दहा कर्मचारी देखरेख करणार आहेत. शिवाय परिसरात ट्रप कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यांचीदेखील दररोज तपासणी होणार आहे.
बिबटय़ाच्या शोधासाठी तज्ञांची आणि प्रशिक्षकांची मदत मिळाली का?
राज्यात वन्यप्राण्यांविषयीचे अनेक तज्ञ आहेत. शिवाय रेसकोर्स परिसराला वनखात्याच्या तज्ञांनी आणि प्रशिक्षकांनी भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. टॅप कॅमेरे, कोम्बिंग ऑपरेशन याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन झाले आहे. गदग, शिमोगा, दांडेली येथून तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
महिना उलटला तरी बिबटय़ाचा ठावठिकाणा सापडला नाही. सध्या उत्सवाचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत कर्मचाऱयांचे नैतिक मनोबल वाढविण्यासाठी काय करत आहात?
माझे कर्मचारी आणि सहकारी महिनाभर शोधमोहिमेत सक्रिय आहेत. सध्या उत्सव असला तरी ‘आधी बिबटय़ाचा शोध मग उत्सवासाठी उपस्थिती’ असे स्वतः सांगतात. बिबटय़ा चकवा देत असला तरी शोध घेण्यामध्ये वनखाते व पोलीस खाते यांचे प्रयत्न आणि दमछाक नाकारता येत नाही. वास्तविक महिनाभर शोध घेऊनही हाती काही न लागल्याने निराशा येवू शकते. परंतु पोलीस आणि वनखात्याच्या कर्मचाऱयांचे मनोबल ढळलेले नाही. या मोहिमेमध्ये ते सदैव कार्यरत राहिले
आहेत.
बिबटय़ाबाबत अफवा पसरविल्या जातात, याबद्दल काय सांगाल?
-सोशल मीडियावर आलेला व्हिडिओ खरा आहे का? याची प्रत्येकाने खातरजमा करणे आवश्यक आहे. शिवाय बिबटय़ाबाबत एखादा व्हिडिओ आल्यास त्याची वनखात्याकडून पडताळणी करून घ्यावी. चुकीच्या आणि फेक न्यूजमुळे राजस्थानचा व्हिडिओदेखील काही क्षणात बेळगावचा होतो. अशा अफवांमुळेच अडचणी वाढत आहेत. वनखात्याकडून दुजोरा मिळाल्याशिवाय कोणत्याही फेक व्हिडिओवर विश्वास ठेवून नये. कोणीही इतर ठिकाणांचा व्हिडिओ बेळगावचा म्हणून व्हायरल करतो. त्यामुळे जनता भयभीत होऊ शकते. सत्यता पडताळण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा, आम्ही माहिती देण्यास तयार आहोत.









