ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
तामिळनाडूतील कुन्नुर येथे लष्कराचे एम आय 17 व्ही 5 या प्रकारचे हेलिकॉप्टर सरलष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांचे कुटूंबीय प्रवास करत असताना कोसळले. ही दुर्घटना सरलष्कर प्रमुख रावत वेलिंग्टनहून दिल्लीला परतत असताना दुपारी १२.४० च्या दरम्याने घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत साधारण १४ जण असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की आजूबाजूला आगीच्या ज्वाला दिसत होत्या. एएनआय प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अपघाताच्या ठिकाणी सापडलेले मृतदेह तामिळनाडूमधील वेलिंग्टन मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
ही दुर्घटना झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का बसला आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तसंच इतर १४ वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत असुन चौघांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बिपीन रावत सुखरुप असावेत अशी प्रार्थना केली आहे. त्याच बरोबर काँग्रेस नेते राहूल गांधी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंदरा राजे सिंदीया, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रावत यांच्या सुखरुपतेसाठी प्रार्थना केली आहे.








