ऑनलाईन टीम / मुंबई :
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हौतात्म्याबद्दलच्या पोस्टला काही इस्लामी कट्टरपंथीयांनी सोशल मीडियावर स्माईली इमोजी पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे संतापलेले केरळमधील मल्याळी चित्रपटांचे दिग्दर्शक अली अकबर यांनी थेट धर्मांतराची घोषणा केली आहे.
अली अकबर यांनी बिपीन रावत यांच्या हौतात्म्यावरुन फेसबुक लाईव्ह केले होते. त्यावर इस्लामी कट्टरपंथीयांनी स्माईली इमोजी घातल्या होत्या. दरम्यान, या लोकांनी सीडीएस रावतची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या याच वृत्तीमुळे अली अकबर यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. देशाच्या खऱ्या नायकाला इस्लामी कट्टरपंथीय लोक अशा प्रकारे लक्ष्य करत आहेत. मुस्लीम धर्मातील वरिष्ठ नेत्यांनी देखील अशा कृत्यांचा निषेध नोंदवलेला नाही. भारतीय संरक्षण दलाच्या शौर्यवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासंदर्भातील अशा प्रतिक्रिया स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मी आणि माझी पत्नी ल्युसायामा इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्विकारणार आहे, असे अली अकबर यांनी म्हटले आहे. धर्मांतरानंतर अली अकबर यांचे नाव राम सिंग असे असणार आहे.