तक्रारीनंतर नंदगड पोलिसांची कारवाई : दोघांवर गुन्हा, सासू फरार
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील हेब्बाळ येथील नवविवाहिता शानवी पत्री हिने रविवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बिडी येथील राहत्या घरी खोलीचे दार बंद करून लोखंडी हुक्काला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.
याबाबत माहेरच्यांनी घातपात झाल्याची तक्रार नंदगड पोलीस स्थानकात केली आहे. मात्र नंदगड पोलिसांनी दि. 6 नोव्हेंबर रोजी अनैसर्गिक मृत्यू असा गुन्हा दाखल केला होता. माहेरच्यांनी ऍड. सुधीर गावडे यांच्यामार्फत महिला आयोग तसेच पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नंदगड पोलिसांबाबत तक्रार दाखल केली होती. यानंतर नंदगड पोलिसांनी पुन्हा वेगळा गुन्हा नोंद करून पती सूरज पत्री व सासू रेणुका मष्णू पत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सासू रेणुका ही फरार असून सूरज याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मूळगाव हेब्बाळ येथील विठ्ठल तम्माणा गुरव सध्या राहणार कोल्हापूर यांची मुलगी शानवी सूरज पत्री (वय 22) हिचा विवाह सहा महिन्यांपूर्वी बिडी येथील सूरज पत्री याच्याबरोबर कोल्हापूर येथे मोठय़ा थाटात करून दिला होता. मात्र विवाहानंतर कायम किरकोळ वाद होत हेते. किरकोळ वादामुळे कोणीही गांभीर्याने घेतले नव्हते. सामंजस्याने राहण्याचा सल्ला नवदाम्पत्याला दिला होता. याबाबत हलशी येथे दि. 6 रोजी बैठक घेऊन वाद मिटविण्यात आला होता. त्यानंतर सूरजने पत्नी शानवीला आपल्या दुचाकीवरून बिडी येथे नेले होते. थोडय़ाच वेळात शानवीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे माहेरच्यांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत शानवीची आई रुक्मिणी गुरव हिने नंदगड पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नेंद करून हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्या झाल्यानंतर फिर्याद नोंदवून घेण्यासही नंदगड पोलिसांनी टाळाटाळ केली होती.
दोन तास शानवीच्या आई, वडिलांना ताटकळत ठेऊन नंतर फिर्याद घेऊन अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे नोंद केले होते. आत्महत्या झालेल्या ठिकाणच्या वास्तुस्थितीची पाहणी केल्यानंतर आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. यासाठी सासरच्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी नंदगड पोलिसांकडे मागणी करत होते. मात्र पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर ऍड. सुधीर गावडे यांच्या माध्यमातून त्यांनी महिला आयोग व वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडे नंदगड पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नंदगड पोलिसांना याबाबत क्रम घेणे भाग पडले, अशी माहिती सुधीर गावडे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार नंदगड पोलिसांनी पुन्हा गुन्हा नोंद करून पतीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. नंदगड पोलिसांच्या या कृतीबद्दल परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.









