राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचा विरोधकांचा आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
बिटकॉईन प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. या प्रकरणाचा योग्यप्रकारे तपास केला जात नाही. एका आरोपीला तर अनेकवेळा या प्रकरणात अटक झाली आणि त्याला जामीन मिळाला. यामध्ये पोलिसांनीही भ्रष्टाचार केल्याचा संशय असून या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी विधानपरिषद सदस्य व्ही. क्यंकटेश यांनी विधानपरिषदमध्ये केली.
यावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी पोलिसांनी योग्यप्रकारे तपास केला आहे. यामध्ये अनेक जणांची फसवणूक झाली आहे, हे आम्हालाही माहिती आहे. मात्र पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत संबंधितांवर योग्य कारवाई केली आहे. संशयित आरोपीची चौकशी करताना सर्व काळजी घेतली गेली आहे, असे सांगून यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारच सामील आहेत. त्यामध्ये अनेकांची फसवणूक झाली असून त्याबाबत विविध पोलीस स्थानकांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्र्यांच्या या उत्तरावर समाधानी नसल्याचे सांगत व्ही. व्यंकटेश यांनी या प्रकरणामध्ये जे राजकीय व्यक्ती आहेत त्यांचीही चौकशी होणे महत्त्वाचे आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करताना गोंधळ घालण्यात आला आहे. आरोपीच्या वडिलांनी पोलिसांनी माझ्या मुलाला अमलीपदार्थ घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. असे सांगत पोलीस या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
मात्र सभापती बसवराज होरट्टी यांनी याकडे अधिक लक्ष न देता तुम्हाला उत्तर दिलेले आहे, असे सांगत हा प्रश्न तेथेच थांबविला.









