पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंना सल्ला : नवी दिल्लीत घेतली भेट
प्रतिनिधी / बेंगळूर
बिटकॉईन प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोणतीच चर्चा झालेली नाही. बिटकॉईन प्रकरणाकडे लक्ष न देता निष्ठा अन् धैर्याने काम करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते
मुख्यमंत्री बोम्माई पुढे म्हणाले, बिटकॉईनबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही. आपण याची माहिती देत असताना याकडे लक्ष देऊ नका. काळजी न करता त्याचा विचार सोडून देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बसवराज बोम्माई यांनी मुख्यमंत्री होऊन 100 दिवसात हाती घेतलेल्या कामांबद्दल आणि जारी केलेल्या योजनांबद्दल आनंदी होऊन पंतप्रधानांनी कौतुक केले.
बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, पण यावेळी बिटकॉईन प्रकरणाबाबत चर्चा झालेली नाही.
केंद्राच्या तपास यंत्रणा अमित शाह यांच्या देखरेखीखाली आहेत. त्यामुळे बिटकॉईनबाबत चर्चा झाली नाही. त्यांच्याकडे माझ्यापेक्षा अधिक माहिती असल्याने त्यांना माहिती देण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अतिशय छान आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने झाली. यावेळी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रशासनावर बरीच चर्चा झाली.
100 दिवसातील आपल्या सरकारचे निर्णय, प्रशासन सुधारणा याबाबतही चर्चा केली आहे. याचबरोबर अमृत योजनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. शेतकऱयांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणारी विद्यानिधी योजना चांगली आहे. ही योजना यशस्वी झाल्यास इतर राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे मोदींनी सांगितले आहे, असेही मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले.
प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी योजनांच्या निविदांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राज्यात नवे शैक्षणिक धोरण जारीबाबतही चर्चा झाली असून विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापकांना विश्वासात घेऊन योजना यशस्वीपणे जारी करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी डिसेंबरमध्ये राज्य दौऱयावर
डिसेंबरमध्ये चार योजनांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांना राज्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी दोन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याबाबत सहमती दर्शविली आहे. बेंगळुरातील उपशहर रेल्वे योजना, बेंगळूर विश्वविद्यालय आवारात आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या उद्घाटन समारंभात ते सहभागी होणार आहेत. याचबरोबर राज्यातील 181 आयटीआयचे आधुनिकीकरण कार्यक्रम आणि बेंगळूरच्या विकासाला संबंधित कार्यक्रमांच्या उद्घाटनातही ते उपस्थिती दर्शविणार आहेत. तसेच याची तारीख पंतप्रधान कार्यालय निश्चित करणार आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले.









