काही लोक आपले कर्तव्य पार पाडत असतानाच माणुसकी दाखविल्यामुळे मोठा नावलौकिक मिळवतात. लोकांच्या मदतीसाठी ते कधीही मागे हटत नाहीत. असाच एक प्रकार नुकताच बेंगळूरमध्ये निदर्शनास आला. ब्रेन टय़ूमरच्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात असताना सीआयडी जंक्शनजवळ रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर झाला. कुटुंबीयांना आणि रुग्णवाहिका चालकाला याची माहिती मिळताच ते घाबरले, मात्र त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने तेथे पोहोचून त्यांना मदत केली.
नातेवाईक रुग्णाला तातडीने दवाखान्यात पोहोचवण्याच्या चिंतेत असताना लवकरात लवकर दुसरी रुग्णवाहिका कशी मिळेल याचा विचार करत होते. त्यानंतर पोलीस कर्मचाऱयाने रुग्णवाहिकेचा टायर खोलून तो बदलला आणि दुसरी रुग्णवाहिका येण्यापूर्वी त्यांना रुग्णालयात पाठवले. देवाप्रमाणे ऐनवेळी मदतीला धावणाऱया या ट्राफिक पोलीसचे नाव कसप्पा कल्लूर असे आहे. रुग्णवाहिका पंक्चर होताच तो तिथे पोहोचला. रुग्णासोबत त्याची पत्नी आणि मुलगी रुग्णवाहिकेत होती. तो खूप अस्वस्थ झाला. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याला लवकरात लवकर दुसऱया रुग्णालयात पाठवावे लागले. दुसरी ऍम्ब्युलन्स यायला 30 मिनिटांचा अवधी असताना त्याने स्वतः ड्रायव्हरला मदत करत टायर बदलला. पोलीस सहआयुक्त रविकांता गौडा यांच्यासह नागरिकांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले.









