ऑनलाईन टीम / मुंबई :
बिग बॉस शोमध्ये मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या गायक जान कुमार सानू विरोधात मनसे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर बिग बॉस शो प्रसारित करणाऱ्या कलर्स टीव्हीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.

कलर्सने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कालच्या भागात मराठी भाषेविषयी जो वादग्रस्त भाग प्रसारित झाला तो आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकत आहोत. तसेच महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत आहोत.
पुढे पत्रात म्हटले की, महाराष्ट्रातील प्रेक्षक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, बिग बॉस रिॲलिटी शोमध्ये गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.









