कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये गोमंतकीय गणेशोत्सवाला सामोरे जाणार आहेत. अशा अवस्थेत गोमंतकीय गणेशोत्सव किती उत्साहाने साजरा करतात, हे पहावे लागेल.
संपूर्ण देशाबरोबरच गोव्यातही कोरोना विषाणूने उग्र रूप धारण केले आहे. गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दगावणाऱयांचीही संख्या वाढत आहे. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी जे डॉक्टर जीवाचे रान करीत आहेत, ते देखील कोरोनाबाधित होत आहेत. गोव्यातील राजकारणीही बाधित होत आहेत. जनसेवा करणारे पोलीस व अन्य यंत्रणाही बाधित होत असल्याने सध्या चिंता वाढली आहे. अशा कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये गोमंतकीय गणेशोत्सवाला सामोरे जाणार आहेत. 25 मार्चला टाळेबंदी लागू झाल्यापासून गोव्यात सुरू झालेली संकटांची मालिका आजही संपलेली नाही. कोरोनामुळे एकीकडे आसू अन् एकीकडे हसू अशी अवस्था गोमंतकीयाची बनली आहे. अशा अवस्थेत गोमंतकीय गणेशोत्सव किती उत्साहाने साजरा करतात, हे पहावे लागेल.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक असू नये, असे निर्बंध घालण्यात आले आहेत. आगमन व विसर्जन मिरवणुकीत गर्दी होऊ नये, कमीत कमी कार्यकर्त्यांच्या सहभागाने मूर्ती आणता यावी, यासाठी ही मर्यादा घालण्यात आली आहे. अशा सूचना सरकारी यंत्रणेमार्फत देण्यात आल्या असल्या तरी अनेकांच्या मूर्ती विशिष्ट उंचीनुसार नोंदविण्यात आल्या आहेत. त्यात बदल घडणे कठीण आहे. बहुतांश गोमंतकियांनी चित्रशाळेत लहान आकाराच्या मूर्ती नोंदविलेल्या आहेत. त्यामुळे मूर्तिकारांना नेहमीच्या तुलनेत बराच तोटा सहन करावा लागणार आहे. काही मूर्तिकारांकडे वर्षानुवर्षे काम करणारे कारागीर टाळेबंदीमुळे बाहेरील राज्यात अडकून पडले असून त्यामुळे गोमंतकीय मूर्तिकारांनी अवघ्याच मूर्ती बनविल्या आहेत. त्यातून अर्थार्जन होण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. कोरोनाच्या महासाथीमुळे व्यवसायात यंदा घट होणार आहे. तसेच मूर्तिकारांच्या उपजीविकेचा प्रश्नही उपस्थित होणार आहे. अकरा दिवस, अनंत चतुदर्शी व 21 दिवशीय साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवसांत आटोपता घेण्याचा निर्णय अनेक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला आहे. तसेच घरगुती गणेशोत्सवही बहुतांश दीड दिवसांचाच साजरा होणार आहे. कोरोना महामारीमुळे गणेश उत्सवावर खऱया अर्थाने विरजण पडले आहे.
गणेश उत्सवात कामानिमित्त म्हणा किंवा व्यवसायानिमित्त शहरी भागात स्थायिक असलेल्या गोमंतकियाला आपल्या गावच्या गणपतीचे वेध लागतात व तो गणेश उत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातो मात्र यंदा एकत्रितपणे हा उत्सव साजरा करताना अडचण सहन करावी लागणार आहे. एकत्रितपणाचा उत्साह दिसणार नाही. राज्याबाहेर असलेल्यांनी तर आपल्या मूळ गावी येण्यास अडचण निर्माण होत असल्याने गणेश पूजन न करण्याचाही निर्णय घेतलेला आहे.
गणेशोत्सव म्हणजे भटजीबुवांचा थाट वेगळाच असतो. गावचा पुरोहित आपल्या अखत्यारीत येणाऱया पूजेची जबाबदारी पेलण्यासाठी बाहेरील राज्यातून भटजींची फौज मागवायचा मात्र यंदा मात्र टाळेबंदीमुळे हे चित्र दिसून येणार नाही. तसेच घरोघरी जाऊन गणेश पूजन न करण्याचा निर्णयही पुरोहित मंडळींनी घेतला असल्याने भटजी मिळविण्यासाठीची जी धडपड गोमंतकीय गणेशभक्तांची होती, ती यंदा दिसून येणार नाही. एकूणच भटजींची गणेश पूजनानिमित्त होणारी बडदास्त दिसून येणार नाही. तसेच गणेश पूजा आटोपण्यासाठी भटजींची जी कसरत व्हायची, त्यावरही यंदा निर्बंध येणार नाही. एकूणच गोमंतकीय ऑनलाईन पद्धतीने म्हणा किंवा व्हीडिओ, ओडियोच्या माध्यमातून, पुस्तकाद्वारे गणेशपूजनाचा मान सांभाळणार आहेत. गणेशपूजनाचे यातून त्याला कितपत समाधान लाभणार, हे पहावे लागेल.
गणेशोत्सव म्हटला म्हणजे गोमंतकीय रंगरंगोटी म्हणा किंवा अन्य घर सफाईसाठी सज्ज व्हायचा, मात्र यंदा हे चित्र दुर्लभ आहे. माशेल, कुंभारजुवे येथील 21 दिवशीय वैशिष्टय़पूर्ण, कलात्मक गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेशभक्तांची पावले त्याठिकाणी वळायची. गोव्यात येणारे पर्यटकही याठिकाणी आवर्जून भेट देऊन आगळय़ावेगळय़ा गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेऊन तृप्त व्हायचे मात्र यंदा कोरोना महामारीमुळे या सर्व गोष्टींना मुकावे लागणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱया माटोळी सामानाचीही लाखोंची उलाढाल व्हायची. यंदा मात्र यात घट दिसून आली आहे. कोरोनाचा फटका गणपती मूर्तिकारांना बसला तसाच तो पखवाज आणि तबला दुरुस्ती करणाऱया कारागिरांनाही बसला आहे. स्थानिक कारागिरांकडे हे साहित्य दुरुस्ती करण्यासाठी रांगा लागायच्या मात्र यंदा भजनेच होणार नसल्याने हे चित्र दिसून आले नाही. लॉकडाऊनमुळे अडकल्याने गोव्यात येणाऱया सोलापुरी तबला कारागिरांनाही हा व्यवसाय करणे शक्य झाले नाही. एकंदरीत गणेशोत्सवावर उपजीविका चालविणारे फूल व्यावसायिक म्हणा किंवा अन्य घटक यांच्याही व्यवसायावर कोरोना महामारीमुळे गंडांतर आलेले आहे. गोव्याची मदार केवळ पर्यटन व खाण व्यवसायावरच अवलंबून आहे, मात्र हे व्यवसाय संकटात सापडले आहेत. ते सुरळीत चालण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना करूया. तसेच गोमंतकियांच्या आरोग्याच्या प्रश्नीही साकडे घालूया.
विघ्नहर्त्याचे पूजन करणारे गोमंतकीय सध्या आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या विघ्नांच्या मालिका सरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ही संकटाची मालिका कधी संपेल, हे आगामी काळात पहावे लागणार आहे. आज आम्ही विद्यमान स्थितीत समस्त गोमंतकीय गणेशभक्त श्रींकडे एकच मागणे मागू शकतो, ‘बा गणराया, गोवा राज्यावर तसेच समस्त देश, जगभरात आलेले कोरोना विघ्न तसेच अन्य समस्या दूर कर महाराजा, सगळय़ांचे आरोग्य चांगले ठेव महाराजा. ’
राजेश परब








