प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हयामध्ये एकूण 11 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून एका रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. एका दिवसात चार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये पाटण तालुक्यातील 10 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. ही बाब चिंताजनक असून संचारबंदी, जमावबंदी लागू असताना देखील लपून-छपून लोक जिल्हय़ामध्ये येत आहेत. कोणत्याही परिस्थिती बाहेर जिह्यातील नागरिक हा सातारा जिह्यात येणार नाही यासाठी आणखीन कडकरित्या प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात गृहराज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱयांची कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थिती होते.
मंत्री देसाई यांनी जिल्हय़ातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये सातारा जिल्हय़ात बाहेरुन आलेल्या 380 व्यक्तींना सातारा जिल्हय़ातील 10 ठिकाणच्या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. दि.10 एप्रिलपर्यंत केवळ 122 व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. आजतारखेला 380 व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. एकूण 11 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यातील दोन मयत व एका व्यक्तीस घरी सोडून त्यास होम कॉरटाईंन करण्यात आले आहे. नव्याने चार व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. असे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.
20 एप्रिल नंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथीलता मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. परंतु याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबतची माहिती जिह्यातील लोकांना द्यावी. अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच जिह्यात पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱया उपाययोजना, पाणी पुरवठा योजनांची कामे याबाबत सुद्धा नियोजन करावे, अशा सूचनाही देसाई यांनी शेवटी केल्या…
चेकपोस्टवर सीसीटीव्हीचा वॉच
जिह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. या चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱया व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून सुमारे 500 गुन्हे या काळात नोंद झाले आहेत. एकावेळी एका गुन्हय़ामध्ये 100 ते 125 व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दिली.
चेकपोस्टवर कडक उपाय योजना करा
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यावेळी म्हणाले, बाहेरुन आलेल्या 380 व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे ही बाब चिंता वाढवणारी आहे. संचारबंदी, जमावबंदी असतानाही लोक जिल्हय़ात येतात ही बाब गंभीर आहे. यावर कडक प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. जिल्हय़ात एकूण दोन लाखाच्या वर लोक बाहेरगांवाहून आल्याची नोंद आहे. पाटण मतदारसंघात तर 60 ते 63 हजार लोक बाहेर गावाहून आले आहेत. 10 महिन्यांच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ही बाब अतिशय गंभीर असून याबाबत आपण सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
कोणालाही ढिले सोडू नका केंद्र शासनाने 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पाटण मतदारसंघातील कोयनानगर येथील प्रकल्पाचे रुग्णालय असून या रुग्णालयात दिवसाकाठी 200 ते 250 लोक उपचाराकरीता येत असतात याठिकाणी आवश्यक तो औषधसाठा देणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आवश्यक असणाऱया औषधांची मागणी मागवून घेवून तो औषधसाठा दयावा, अशा सुचना देवून सातारा जिल्हयात कोरोनाचा धोका वाढू नये याकरीता प्रशासनाने संचारबंदीची व जमावबंदीची प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करावी अशा सक्त सूचना केल्या….