ऑनलाईन टीम / मुंबई :
महत्त्वाच्या तारखा, दिनविशेष, अनेक दिग्गज, त्यांचे योगदाना सलाम करण्यासाठी गुगलकडून नेहमीच रंगीबेरंगी डूडल तयार केले जाते. त्यानुसार आज याच गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून बास्केटबॉलची सुरुवात करणाऱ्या जेम्स यांच्या कार्याची आठवण ठेवली आहे.
सुमारे 130 वर्षापूर्वा कॅनडीयन-अमेरिकन नागरिक असलेल्या जेम्स नायस्मिथ यांनी बास्केटबॉलची सुरुवात केली. पेशाने शिक्षक, डॉक्टर, आणि कोच असलेल्या जेम्स नायस्मिथ यांनी विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुलित रहावे यासाठी 1891 साली बास्केटबॉलच्या खेळाची ओळख करुन दिली आणि तिथूनच बास्केटबॉलची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.
जेम्स नायस्मिथ यांनी कॅनडाच्या ओंटारियो या शहरातील मॅकगिल विद्यापीठातून शारीरिक शिक्षणाची पदवी घेतली. 1890 साली त्यांनी मेसाच्युसेट्सच्या स्प्रिंगफील्ड मधील YMCA इंटरनॅशनल ट्रेनिंग कॉलेजमध्ये नोकरीला सुरुवात केली. या ठिकाणी इनडोअर गेम विकसित करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.जेम्स नायस्मिथ यांनी 21 डिसेंबर 1891 साली पहिल्यांदा खेळाडूंच्या मदतीने या खेळाची सुरुवात केली. या खेळाचे अनेक नियम हे फुटबॉल आणि फील्ड हॉकीमधून घेण्यात आले. त्यानंतर हा खेळ अमेरिकेतच नव्हे तर पूर्ण जगभरात प्रसिध्द झाला. 1936 सालच्या बर्लिन ऑलंपिकमध्ये पहिल्यांदा बास्केटबॉलचा समावेश करण्यात आला.
1937 मध्ये नायस्मिथ सेवानिवृत्त झाले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे ब्रेन हेमरेज ने निधन झाले. मॅसेच्युसेटसच्या स्प्रिंग फिल्ड येथील एनबीएच्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये देखील त्यांच्या नावाचा समावेश करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. आता बास्केटबॉल हा खेळ जवळपास 200 देशांमध्ये खेळला जातो.