प्रतिनिधी/ वाई
जिल्हाधिकार्यांनी लावलेले 144 कलम बावधनच्या भैरवनाथाच्या भक्तांनी धुडकावून लावून मोठया जल्लोशात बगाड यात्रा साजरी केली खरी पण बगाड मंदिरात पोहचताच वाई पोलीसांनी यात्रेचे नियोजन करणार्यांचे अचानकपणे सुरू केलेले अटक सत्र त्यामुळे या भक्तांच्या आनंदात विरजंन पडल्यासारखे बावधन ग्रामस्थांना जाणवले. आणि मिळालेल्या आनंदातच चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दि. 2 रोजी पोलीसांनी 83 जणांना अटक केली. तर आज दि. 3 रोजी 13 जणांना अटक करून त्याचा आकडा आता 96 वर पोहचला आहे. बगाडाचा रथ हा देवळात पोहचल्यानंतर बगाडयाला खाली उतरून घेतले जाते व तो रथ यात्रेच्या दुसर्या दिवशी म्हणजे दि. 3 रोजी बैला ऐवजी भाविक भक्तांनी ओढून गावातून त्यांची मिरवणुक काढून तो नियोजित स्थळी पोहचविण्याची पुर्वी पासूनची प्रथा आहे. तो गाडा मिरवणुकीने नेवू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेवून आज दि. 3 रोजी तो बगाडाचा रथ रोखण्यासाठी व पिढयानपिढया असणारी रुढी थोपविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी बावधन गावात 100 पोलीसांची एक तुकडी बंदोबस्तासाठी लावली आहे. त्यामुळे बगाडाचा हा रथ सध्या भैरवनाथाच्या मंदिरासमोरील पटांगणामध्ये नियोजीत स्थळी जाण्याची वाट पाहत उभा आहे. या अटकेची व धरपकड करण्याची जोरदार मोहिम राबविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी अतिरिक्त पोलीस प्रमुख असलेले धिरज पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविली असल्याने ते दिवसभर वाई पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून आहेत.
काल पकडलेल्या 83 जणांना मेहरबान कोर्टाने त्यांची कालच जामीनावर सुटका केली आहे. आणि आजच्या 13 जणांनाही कोर्टाने जामीनावर मुक्तता केला आहे.
बावधनकरांनी जल्लोषात बगाड यात्रा करून पोलीस प्रशासनावर नामुष्कीची वेळ आणली होती. प्रशासनाने बगाड यात्रेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून संयमाची भूमिका घेतली. यात्रा सुरळीत पार पडू दिली. बगाड व बगाडया मंदिरात पोहचताच. पोलीसांनी अटक व धाडसत्रास सुरूवात केली. पोलीसांनी बगाडाचे काढलेल्या व्हीडिओच्या सहाय्याने बगाडयासह पहिल्याच दिवशी घराघरातून 83 जणांना अटक केली. रात्री उशीरापर्यंत हे अटक सत्र सुरूच होते. यामुळे बावधनकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. हे अटक सत्र दुसर्या दिवशीही पोलीसांनी सुरूच ठेवत आणखी 13 जणांना अटक करून कोर्टासमोर उभे केले. त्यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली.
बावधनकरांनी जल्लोषात साजरे केलेल्या बगाडामुळे पोलीस यंत्रणा आता काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र पोलीसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता अटक सत्राचा धडाका सुरू करून ग्रामस्थांना धडकी भरवली आहे. यामुळे आगामी गावांमध्ये होणार्या यात्रा तसेच फुलेनगर, सुरूर येथे निघणारी बगाडे तसेच अन्य गावातील यात्रे दरम्यान होणारे धार्मिक कार्यक्रम करणे स्थानिक ग्रामस्थांना डोकेदुखीचे होणार आहे. पोलीसांच्या या कठोर पावलाने गावोगावच्या ग्रामस्थांवर वचक बसणार असून येथून पुढील यात्रांमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात येईल, असे वाटते.








