कोल्हापूर/प्रतिनिधी
भाजपच्या प्रचारावेळी कसबा बावड्यातील रस्त्यावर काढण्यात आलेली रांगोळी पुसण्यापर्यंत ते माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या महिलांच्या बाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. एकंदरितच चुनावी जुमला सुरू झाला असून विरोधकांची उट्टे काढण्याची स्पर्धा जणू सुरु झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मध्ये सुरू असलेल्या राजकारणाची झळ आता जिल्ह्यात उमटू लागली आहे.
निवडणूक कोणतीही असो, तो विषय कसबा बावड्यात गेला तर सहाजिकच बावड्याच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकावर घ्यायला लागते. खरे तर पालकमंत्री सतेज पाटील यांची पकड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर असली तरी, कोल्हापूर उत्तर विधानसभेमधील कसबा बावडा हा भाग त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण या बालेकिल्ल्यात विरोधकांनी घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याची चर्चा जिल्ह्यात होते. सध्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचार फेरीसाठी भाजपचे प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कसबा बावड्यात प्रवेश केला. भाजपची प्रचार फेरी आणि स्वतः महाडिक प्रचार फेरी साठी येणार म्हटल्यावर गल्लोगल्ली रांगोळी काढण्यात आली होती. मात्र बावड्यातील महिलांनी आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या चमच्यांनी ही रांगोळी टँकरने पाणी आणून पुसली असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली.
पण बावडेकरांनी याला त्याच भाषेत उत्तर दिलं. कसबा बावड्यातील लोक हे स्वाभिमानी आहेत. गल्लोगल्ली रांगोळी काढत असताना त्यात गल्लीतील महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मात्र गल्लीतील महिलांनी रांगोळी काढली नसताना, कमिशन घेऊन बाहेरील एजंटांकडून रांगोळी काढून घेत असल्याचा आरोप बावड्यातील कार्यकर्त्यांनी केला.
त्यात बुधवारी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांच्या बाबत वक्तव्य केलं त्याची चर्चा दिवसभर रंगली. अनेक महिलांनी त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. धनंजय महाडिक यांनी, तुमचा नवरा प्लंबर आणि इलेक्ट्रिशन असेल तर, तुम्हाला ते काम जमणार का? ज्यांचे काम त्यांनीच करावं. अशा पद्धतीचे वक्तव्य केलं होतं. मात्र याच संधीचा फायदा घेत विरोधकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात निषेधाचा सूर व्यक्त केला. त्यामुळे एकंदरीतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यामध्ये, विरोधकांची उट्टे काढण्याची वेळ हातातून निसटत कामा नये, अशा पद्धतीची पकड दोन्ही बाजूच्या नेत्यांनी ठेवली आहे.
आग उत्तरेत आणि धूर कागलात
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक शहरापुरतीच मर्यादित असली तरी, त्याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. कोल्हापूर उत्तरेत राजकारण पेटले असलं तरी त्याचा धूर कागल तालुक्यात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ३ लाख कार्यकर्त्यांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. तीन लाख कार्यकर्ते हे युक्रेन च्या युद्धात पाठवा असा टोला मुश्रीफ यांनी भाजपला लगावला होता. त्याला विरोध म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्यावर निशाणा साधला. महिला मंडळाच्या माध्यमातून आजवर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किती महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले? असा सवाल करत त्यांनी मुश्रीफांना टोला लगावला. त्यावरूनच निवडणूक उत्तर मध्ये होत असली तरी त्याचे परिणाम कागल जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहेत.









