आजच्या एपिसोडमध्ये ऋतुजा आपला अभिनय सादर करणार आहे.
नंदगड/ वार्ताहर
कलर्स मराठी या वाहिनीवर संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारीत बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मूळ हेब्बाळ येथील व सध्या पुणे येथे स्थायिक असलेली ऋतुजा पांडुरंग गुरव ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत झळकणार आहे. सोमवार दि. 27 रोजीच्या एपिसोडमध्ये ती आपल्याला दिसणार आहे. यामुळे तिचे हेब्बाळ व पुणे येथे कौतुक हेंत आहे.
हेब्बाळ ता. खानापूर येथील ऋतुजाचे वडील पांडुरंग गुरव कामानिमित्ताने गेल्या तीस वर्षापासून पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांची कन्या ऋतुजा लहानपणापासूनच हुशार व गुणी मुलगी होती. लहानपणापासून तिला अभिनयाची आवड असल्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये होणाऱया कार्यक्रमात ती हिरीरीने सहभागी होऊन आपला अभिनय सादर करायची. सध्या ती कॅम्प्युटर सायन्स कोर्स करत आहे. तरी तिची अभिनय करण्याची तळमळ कमी झालेली नाही. तिने अनेक प्रकारची नाटके व लहान मालिकेत काम केले आहे. तिचा अभिनय पाहता तिला लोकप्रिय असणाऱया कलर्स वाहिनीवरील ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत अभिनय करायची संधी मिळाली आहे. दोन महिन्यापूर्वी लक्ष्मीच्या भूमिकेसाठी तिने आपला अभिप्राय व्यक्त केला होता. त्यानुसार तिची या पात्रासाठी निवड झाली आहे. सध्या मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढला असला तरी या रोगाबद्दल मनात कोणती भीती न बाळगता अभिनयाची मिळालेली संधी तिने सोडली नाही. आई-वडिलांच्या प्रेरणेने तिने शूटिंगसाठी मुंबई गाठली. गेल्या काही दिवसापासून मुबई येथे लक्ष्मी या पात्रासाठी तिचे शूटिंग सुरू आहे.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील लक्ष्मी ही एका गरीब घराण्यातील प्रेमळ मुलगी असते. तिची संत बाळूमामावर श्रद्धा असते. परंतु घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तिचं लग्न करण्याची ऐपत त्यांच्या घरच्यांची नसते. शिवाय त्यांच्याकडे हुंडा देण्यासाठी पैसे नसतात. परंतु तिचे एका श्रीमंत घराण्यातील मुलाबरोबर लग्न होते. मुलगी बऱयापैकी मिळाली असली तरी हुंडय़ासाठी सासू व घरातील काही माणसं तिला त्रास देत असतात. तरीही लक्ष्मी त्रास सहन करीत दिवस काढत असते. दिवसेंदिवस हा त्रास वाढतच जात असतो. या त्रासातून कधीतरी एकदा मुक्तता मिळेल अशी आशा लक्ष्मीला नेहमीच वाटते. संत बाळूमामावरील श्रद्धा तिला याकामी उपयोगी ठरते. संत बाळूमामा येऊन हा मार्ग सुरळीत करून देतात, असा अभिनय तिचा या मालिकेत दाखविण्यात आला आहे. बाळुमामाची मालिका संपूर्ण महाराष्ट्र गोव्यात तसेच सीमाभागातील गावातून मोठय़ा भक्तिभावाने व उत्साहाने पाहिली जाते. त्या मालिकेत बेळगाव जिल्हय़ातील हेब्बाळसारख्या खेडय़ातील मुलीने काम केल्याने तिच्या अभिनयाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले, असा अभिप्राय ऋतुजा गुरव यांनी वार्ताहराशी बोलताना व्यक्त केला..









