प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील प्रगतिपथावर असलेल्या श्री महालक्ष्मी को-ऑप. बँकेचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब मांगलेकर यांना कर्नाटक सरकारकडून सहकाररत्न पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते त्यांना बेंगळूर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बाळासाहेब मांगलेकर यांनी सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. श्री महालक्ष्मी बँक स्थापन करून अल्पावधीतच त्यांनी या छोटय़ाशा रोपटय़ाचे वटवृक्षात रुपांतर केले. याबद्दल त्यांचा सहकाररत्न पुरस्कार देऊन सत्कार करत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. यावेळी महसूल मंत्री आर. अशोक, सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, सहकार महामंडळाचे अध्यक्ष जे. टी. देवेगौडा, पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ, गृहमंत्री आर. ज्ञानेंद्र, अबकारी मंत्री के. गोपालन उपस्थित होते.
सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळासाहेब मांगलेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते 94 वर्षांचे आहेत. तरीदेखील त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतले आहे, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.









