23 जानेवारी हा भारतीयांच्या दृष्टीने खास दिवस आहे. या दिवशी दोन सेनापतींचा जन्म झाला. एक होते ‘जय हिंद’चा नारा देणारे आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे भारताचे महान सेनानी सुभाषचंद्र बोस आणि दुसरे सेनापती ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असा नारा देणारे शिवसेनेची स्थापना करणारे ‘हिंदू हृदय सम्राट’ बाळासाहेब ठाकरे. ‘इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..’ हे रोमांच उभे करणारे शब्द परत ऐकायचे असतील तर ‘ठाकरे’ हा चित्रपट बघायला हवाच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती. बाळासाहेब एक आगळेवेगळे रसायन होते. त्यांचे एखाद्याला खुले आव्हान देणे असो की उघड धमकी देणे हा अंदाजच हटके असायचा. मर्दानी असायचा. त्यात आपलेपणा असायचा, तशीच चीड व संतापही असायचा. विरोधाभास असा की त्यांचे कट्टर विरोधकसुद्धा त्यांच्यावरील प्रेमामुळे वेळोवेळी ‘मातोश्री’च्या दरबारात हक्काने हजेरी लावायचे. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे आदेशच असायचा. त्यांच्या एका इशाऱयावर संपूर्ण मुंबई थांबत असे. राजकारणात प्रचंड लोकप्रिय आणि दिग्गज मानले जाणारे हे ‘हिंदूहृदयसम्राट’ आपल्या करियरच्या सुरुवातीला एक कार्टुनिस्ट म्हणून काम करायचे. ‘द फ्री प्रेस जर्नल’ या वृत्तपत्रात त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. 1960 च्या दशकात त्यांची कार्टून्स रविवारच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’त छापली जायची. 1960 मधेच त्यांनी ही नोकरी सोडून दिली आणि ‘मार्मिक’ हे एक आगळे वेगळे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. पित्याच्या आदेशानुसार राजकारणात झोकून दिले. बाळासाहेबांनी त्यांचे पिता ‘प्रबोधन’कार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून राजकीय दीक्षा घेतली. प्रबोधनकारांच्या प्रभावाने त्यांचे पूर्ण जीवन व्यापून टाकल्याचे आपल्याला दिसते. तसाच बाळासाहेबांचा प्रभाव उद्धवजींवर आपल्याला स्पष्टपणे दिसतो. भाषेच्या आधारावर महाराष्ट्राला वेगळे राज्य बनविण्याच्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रबोधनकार अग्रणी होते. बाळासाहेबांनी सुरुवातीला महाराष्ट्रातील गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांचा वाढता प्रभाव पाहून त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारले. आजची मुंबईतील मराठी माणसाची अवस्था बघता बाळासाहेब नसते तर मुंबई खरंच महाराष्ट्रात राहिली असती काय हा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. 19 जून 1966 रोजी बाळासाहेबांनी मराठी लोकांच्या हितासाठी काम करणारी शिवसेना स्थापना केली, जिचे राज्यातील मजबूत राजकीय पक्षात रूपांतर झाले आहे. आपल्या वेगळय़ा ठाकरी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाळासाहेबांनी मराठी लोकांपर्यंत आपला आवाज पोहचावा यासाठी 1989 मध्ये ‘सामना’ हे वृत्तपत्र सुरू केले. महाराष्ट्राचा हा वाघ आपल्यासाठी एक सांस्कृतिक आदर्श होता. बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचाराने 1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे सरकार पहिल्यांदा राज्यात आले. या दरम्यान बाळासाहेबांनी सरकारमध्ये न राहता आपल्याला हवे तसे सरकार चालवायला भाग पाडले. यामुळे रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे सरकार हे नाव मिळाले होते. आजची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची होत असलेली अगतिक अवस्था बघता बाळासाहेबांप्रमाणेच त्यांनी सरकारमध्ये थेट सामील न होता सरकार चालवले असते तर आता करताहेत तशा तडजोडी कराव्या लागल्या नसत्या असे वाटते. 1996 मध्ये बाळासाहेबांना 2 मोठे धक्के बसले. 20 एप्रिल 1996 रोजी त्यांचे पुत्र बिंदुमाधव यांचे रस्ते अपघातात निधन झाले आणि सप्टेंबरमध्ये पत्नी मीनाताईचे हार्ट अटॅकने निधन झाल्याने त्यांना जबरदस्त धक्का बसला. आपल्या आक्षेपार्ह भाषणांबद्दल निवडणूक आयोगाने 28 जुलै 1999 रोजी बाळासाहेबांना 6 वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली. कधीही निवडणूक न लढवणाऱया बाळासाहेबांवर याचा काहीही परिणाम होणार नव्हताच. मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेबांनी मराठी माणसांना एकत्र करत मुंबईत दक्षिण व उत्तर भारतातून येणाऱया परप्रांतीय लोकांविरुद्ध जबरदस्त मोर्चा उघडला. महाराष्ट्रातील मराठी माणसांना एकत्र आणून पक्ष वाढविल्यानंतर बाळासाहेबांनी 90 च्या दशकात आपला मोर्चा हिंदुत्ववादाकडे वळविला. बांगलादेशी व पाकिस्तानधार्जिणे मुस्लिम कायमच त्यांच्या निशाण्यावर राहिले. भाजप व इतर उजव्या संघटनांनी जेव्हा मशीद पाडल्याची जबाबदारी घेण्याचे नाकारले तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या शिवसैनिकांनी ती मशिद पाडली असे अभिमानाने सांगितले होते. त्यानंतर ते खऱया अर्थाने ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून देशात नावारूपाला आले. बाळासाहेबांनी एखादा शब्द दिला की ते तो पाळायचेच. 1993 च्या बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव आल्यानंतर त्याला तुरूंगात टाका म्हणणाऱया बाळासाहेबांनी त्याला माफी दिली होती. केवळ सुनील दत्तशी असलेल्या मैत्रीखातर त्यांनी संजय दत्तला माफ केले होते. सुप्रिया सुळेंना राज्यसभेत पाठवताना आपले राजकीय विरोधक शरद पवारांना शब्द दिल्यावर त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही. एवढेच नव्हे तर काँग्रेस नेते व मित्र सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधातही भाजपाशी युती असूनही शब्द दिल्याने उमेदवार उभा करू दिला नाही. घाटी म्हणून उपमर्द सहन करणाऱया मराठी माणसाला मुंबईत खरे सामर्थ्य दिले. मराठी माणसात शक्ती होतीच, ती जागृत करणे आवश्यक होते. ते महान कार्य बाळासाहेबांनी केले. थोडय़ाफार शिकलेल्या शिवसैनिकाला केवळ तो मराठी म्हणून कुठलाही जातीभेद न करता त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री बनवले. 2007 मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हिटलरचे कौतुक केल्याने बाळासाहेबांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. परिणामांबद्दल बाळासाहेब नेहमीच बेफिकीर असत. व्हॅलेंटाईन डे हा हिंदू धर्म आणि संस्कृतीला धोका असल्याचे सांगत त्याला विरोध केला. व्हॅलेंटाईन डे साजरा करणारी हॉटेलातील प्रेमी युगुले, तरुण मुले-मुली दिसली की बाळासाहेबांच्या आदेशाने शिवसैनिक तोडफोड करायचे. काही वेळा शिवसैनिक त्या जोडप्यांची धिंड काढायचे. यामुळे लोकात शिवसेनेविषयी काहीशी नाराजी होती. मात्र, नंतर शिवसेनेने काळानुसार अशा गोष्टींना विरोध करणे सोडून दिले.
17 नोव्हेंबर 2012 ला वयोमान व हृदयविकाराचा झटका आल्याने हे वादळ कायमचे शांत झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला मुंबईत अभूतपूर्व गर्दी लोटली होती. बाळासाहेबांनी काश्मिरी पंडितांचे नेंतृत्व केले असते तर त्यांची जी ससेहोलपट झाली ती कदाचित झाली नसती. सत्तेसाठी बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडून आज शिवसेना नेतृत्व ज्या तडजोडी करत आहे त्या पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला नक्कीच वेदना होत असतील.
विलास पंढरी – 9860613872








