प्रतिनिधी / कोल्हापूर
बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या तिघां तरुणांना विशेष जादा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.महात्मे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सौरभ संजय बोराटे (वय 19), विशाल संजय बोराटे (वय 20) ऋषीकेश संजय हजारे (वय 20 रा. तिघे व्हन्नुर कागल कोल्हापूर) अशी आरोपींची नांवे आहेत. अल्पवयीन मुलगी व्हन्नुर येथे शाळेत जात होती.
ती शाळेत आल्यानंतर आरोपी शाळेच्या प्रवेशद्वारापासून व्हरांड्या पर्यंत पाठलाग करुन तिला अश्लील शब्द वापरणे, ओढणी ओढणे, गुलाबाचे फुल पाठीमागून मारणे, पिडितेच्या नावाने हाका मारुन पाठीमागून येणे अशी कृत्ये एक महिन्यापासून करत होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून पिडितेने कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. कागल पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात आरोपींविरुध्द दोषारोप पत्र दाखल केले होते.
31 मार्च रोजी विशेष जादा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.महात्मे यांच्यासमोर खटल्याचा युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राहÎ मानून आरोपींना तीन वर्षाची सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलगी व साक्षीदारांच्या साक्षी मह्त्वाच्या ठरल्या.









