जनता ममतादीदींबद्दल समाधानी, परंतु भ्रष्टाचारामुळे नाराज
बंगला निजेर मयेके छै म्हणजेच बंगालला स्वतःची मुलगीच हवी हा नारा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या हुगळीतच फिका पडत असल्याचे चित्र आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हुगळी तृणमूलचा बालेकिल्ला होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपने तृणमूलचा हा बालेकिल्ला भेदून लोकसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. तर जिल्हय़ातील आरामबाग लोकसभा मतदारसंघात तृणमूलला चुरशीची लढत दिली होती. 6 एप्रिल रोजी होणाऱया तिसऱया टप्प्यात हुगळी-आरामबागच्या 8 जागांवर मतदान होणार आहे.
या मतदारसंघात भाजपच्या ‘आशोल परिवर्तन’चा चांगला प्रभाव दिसून येत आहे. हरिपाल, आरामबाग, तारकेश्वर आणि गोघाट मतदारसंघात भाजपचं पारंड जडं दिसून येत आहे. तर उर्वरित 4 मतदारसंघात भाजपला विजयाची संधी आहे. 2019 पर्यंत भाजपचे या जिल्हय़ांमध्ये फारसे बळ नव्हते. पण त्यानंतर तृणमूल आणि डाव्या पक्षांचे नेते मोठय़ा संख्येत भाजपमध्ये सामील झाले आणि पाहता पाहता पक्ष प्रभावशाली झाला आहे.
मुस्लीमबहुल भागातही भाजप मजबूत

मुस्लिमांची संख्या अधिक असलेल्या भागांमध्येही भाजप मजबूत स्थितीत दिसून येत आहे, कारण मुस्लीम मते तृणमूल आणि डाव्या-काँग्रेस आघाडीत विभागली जाऊ शकतात. भाजपच्या बाजूने हिंदूंची मते वळण्याची चिन्हे आहेत. 2 लाख 60 हजार मतदार असलेल्या खानकुल मतदारसंघात सुमारे 54 हजार मुस्लीम मतदार आहेत. 2011 पासूनच तृणमूल काँग्रेस येथे एकतर्फी विजय मिळवत आला आहे. तृणमूलने यंदा मुन्शी नजबुल करीम यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सुशांत घोष मैदानात आहेत.
जंगीपाडात त्रिकोणी लढत
जंगीपाडा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि तृणमूलसह संयुक्त आघाडीही शर्यतीत दिसून येत आहे. भाजपने येथे देवजीत सरकार यांना उमेदवारी दिली आहे. देवजीत हे लोकसभा निवडणुकीतही भाजपचे उमेदवार होते, पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता. जंगीपाडा मुस्लीमबहुल भाग आहे. येथे 30 टक्क्यांहून अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे. येथेच फुरफुरा शरीफ असून त्याच्याशी संबंधित पीरजादा अब्बास सिद्दिकी यांनी आयएसएफ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. तृणमूलने येथे स्नेहासि चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघात मुस्लीम मते तृणमूल आणि आयएसएफ यांच्यात विभागली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक लोक ममता बॅनर्जींच्या कामाबद्दल समाधानी असले तरीही स्थानिक नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहेत.
आरामबागमध्ये स्थानिक-बाहेरचा मुद्दा
आरामबाग मतदारसंघात तृणमूलने सुजाता मंडल यांना उमेदवारी दिली आहे. त्या भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी आहेत. तृणमूलमध्ये सामील झाल्यावर सुजाता यांना सौमित्र यांनी घटस्फोट दिला आहे. भाजप उमेदवार मधुसूदन बाग हे स्थानिक रहिवासी आहेत. तर सुजाता मंडल विष्णुपूरच्या रहिवासी आहेत. याचमुळे स्थानिक विरुद्ध बाहेरच्या असा मुद्दा येथील प्रचारात वरचढ ठरू लागला आहे.
तारकेश्वर हायप्रोफाईल मतदारसंघ
तारकेश्वर मतदारसंघात राज्यसभेचे माजी खासदार आणि पद्मभूषण स्वप्न दासगुप्ता हे भाजपचे उमेदवार आहेत. तारकेश्वर एकेकाळी डाव्या पक्षांचा बालेकिल्ला होता, पण डाव्यांचे स्थानिक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. तारकेश्वर मतदारसंघात तृणमूल काँग्रेस अंतर्गत कलहामुळे कमकुवत दिसून येत आहे.
धनियाखाली मतदारसंघ
या मतदारसंघात 2011 पासून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी होत आला आहे. तृणमूलने विद्यमान आमदार असीम पात्रा यांनाच पुन्हा संधी दिली असली तरीही जनतेत त्यांच्याबद्दल नाराजी दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात आघाडी केली होती. पुरसुरामध्ये तृणमूलचा माजी आमदार स्वतःच्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाला आहे. गोघाट मतदारसंघातही हीच स्थिती आहे. या मतदारसंघांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्यास भाजपला लाभ होणे निश्चित आहे. मतदानाची टक्केवारी घटल्यास तृणमूलला स्वतःची सत्ता राखता येईल.









