प्रतिनिधी/ बेळगाव
यक्कुंची (ता. अथणी) येथील एका शाळेच्या शौचालयात आढळून आलेल्या नवजात बालिकेच्या पालकाचा शोध लागला आहे. त्या बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून देणाऱया पित्याला अटक करण्यात आली आहे. सदर पिता हा त्याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवेत आहे.
मागील दहा दिवसांपूर्वी सदर बालिका बेवारस अवस्थेत आढळून आली होती. तिला वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील शिक्षक असणाऱया भीमप्पा बसप्पा कुंभार (वय 31 रा. कोहळ्ळी) याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मागील आठवडय़ाभरात सखोल चौकशी करून यामागील प्रकरणाचा शोध लावला.
अथणी तालुक्यातील यक्कुंची गावामधील सरकारी हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला होता. चौकशीनंतर ही धक्कादायक माहिती उजेडात आली. विशेष म्हणजे सदर शाळेतील एका दहावीच्या विद्यार्थिनीशी असलेल्या प्रेमसंबंधातून त्या बालिकेचा जन्म झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून ही कारवाई केली.









