वाकरे / प्रतिनिधी
बालिंगा (ता. करवीर) येथे टेम्पो सर्व्हिसिंग करत असताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. गौरव अशोक जांभळे (वय २०) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.रविवारी सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर – गगनबावडा राज्यरस्त्याला लागून एस्सार पेट्रोल पंपाजवळ बालिंगा येथे गौरव अशोक जांभळे यांचे स्वामी समर्थ सर्व्हिसींग सेंटर आहे. रविवारी सकाळी ११ वाजता टेम्पो सर्व्हिसिंग करत असताना मालक गौरव याला सर्व्हिसिंग पाईपच्या पितळी नॉबचा विजेचा करंट बसला. याच दरम्यान टेम्पोचालक ऊन असल्याने पलीकडे झाडाखाली थांबला होता.
त्याला गौरव बराच वेळ खालून वर आला नसल्याचे दिसले, तर तेथून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिले असता गौरवला विजेचा धक्का बसला असल्याचे दिसून आले. त्याच्या हाताची बोटे काळी निळी पडून तो निपचीत पडला होता. त्याला त्वरीत उपचारासाठी सीपीआर येथे दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. त्याच्या पश्चात आई,वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
तरुणाच्या निधनाने गावात हळहळ
गौरव या अविवाहित आणि कष्टाळू तरुणाचा स्वतःच्या सर्व्हिसिंग सेंटरवर विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याने बालिंगे गावात हळहळ व्यक्त होत आहे.