-उपसा केंद्रात बसवला सबमर्सिबल पंप –पुराच्या पाण्यात बुडाले तरी उपसा केंद्र राहणार सुरू
विनोद सावंत/कोल्हापूर
बालिंगा उपसा केंद्रामध्ये 335 एच.पी.चा सबमर्सिबल पंप आणि 300 एचपी व्हर्टीकल टर्बाईन पंप बसवण्यात आला आहे. याचबरोबर पॅनेल बोर्डही उंचावर बसवला आहे. यामुळे आता महापूर जरी आला आणि पाण्यात उपसा केंद्र बुडाले तरी उपसा केंद्र सुरू राहणार आहे. शहरातील 35 टक्के भागातील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
कोल्हापूर महापालिकेचे बालिंगा, नागदेववाडी आणि शिंगणापूर असे तीन उपसा केंद्र आहेत. येथून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा होतो. 2019 आणि 2021 मध्ये महापुरात तीनही उपसा केंद्र पाण्यात गेली. यामुळे अनुक्रमे 18 आणि 13 दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद झाला. इतिहासमध्ये प्रथमच इतके दिवस सलग पाणी बंद झाले. महापालिकेकडून भाडÎाने टँकर घेऊन शहरात पाणीपुरवठा करावा लागला. नागरिकांनी पाण्यासाठी अक्षरशः धावपळ झाली. 2019 चा अनुभव पाठीशी असतानाही महापालिकेने 2021 पर्यंत उपसा पंपाची उंची का वाढवण्यात आली नाही, पर्याय का काढले नाहीत, असा सवालही उपस्थित झाले.
यावर उपसा केंद्राची उंची वाढविण्यासाठी 16 कोटींची गरज असून राज्य शासनाकडून निधी मिळाले नसल्याने काम करता आले नसल्याचा दाखला महापालिकेना दिला. दरम्यान, महापालिकेकडून पाणीपुरवठा विभागासाठी आलेल्या विविध योजनेतील निधीतील शिल्लक रक्कमेतून बालिंगा उपसा केंद्रामध्ये 335 एच.पी.चा सबमर्सिबल पंप बसविला आहे. याचबरोबर 300 एचपी व्हर्टीकल टर्बाईन बसवण्यात आले आहे. येथील पंपाची डिलीव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला जोडण्याचे काम होणार आहे. यानंतर पुराच्या पाण्यात जरी उपसा केंद्र बुडाले तरी उपसा केंद्र सुरू राहणार असून शहरातील पाणीपुरवठा खंडीत होणार नाही.
महापुरात पाण्याचे संकट टळले
बालिंगा उपसा केंद्रातील पॅनेल बोर्ड उपसा केंद्राबाहेर 100 फूट उंचावर असणाऱया पाणीपुरवठा विभागाच्या स्टोअर रूममध्ये बसविण्यात आला आहे. या ठिकाणी पुराचे पाणी येत नाही. याचबरोबर 300 एच.पी.चा सबमर्सिबल पंप बसवल्याने पुरात पंप बुडाले तरी 65 टक्के उपसा केंद्र सुरू राहणार आहे. महापुरातही शहरातील 35 टक्के भागात पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
अजय साळुंखे, जल अभियंता, महापालिका
नागदेववाडी उपसा केंद्र होणार बंद
बालिंगा उपसा केंद्राजवळच नागदेववाडी उपसा केंद्र आहे. नागदेववाडी उपसा केंद्र बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाना घेतला आहे. येथील पंपही बालिंगा उपसा केंद्रात बसवले जाणार आहेत.
शिंगणापूर उपसा केंद्र उंचावर घेणे अशक्य
शिंगणापूर उपसा केंद्र उंचावर घेणे अथवा सबमर्सिबल पंप बसवणे अशक्य आहे. शिवाय पर्यायी पाईपलाईन नसल्याने तसेच व्हॉल्व बसवले नसल्याने थेट पाईपलाईन योजना सुरू झाली तर शिंगणापूर उपसा केंद्र बंद करावे लागणार आहे. थेट पाईपलाईन योजनेमध्ये काही बिघाड झाल्यास बालिंगा उपसा केंद्रचा वापर होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
बालिंगा उपसा केंद्रातील बदल आणि फायदा
335 एच.पीचा सबमर्सिबल पंप
300 एच.पीचा व्हर्टीकल टर्बाईन पंप
65 टक्के उपसा केंद्र अखंड राहणार सुरू
35 टक्के परिसरात महापुरातही पाणीपुरवठा
महापुरातही पाणीपुरवठा सुरू राहणारा परिसर
शिवाजीपेठ परिसर, चंद्रेश्वर गल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवार पेठ चौक परिसर, सोमवार पेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, अंबाबाई मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवलक्लब परिसर, खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक