ऑनलाईन टीम / पुणे :
बालकुमारांसाठी लेखन करताना शब्दांचा वापर जबाबदारीने करायला हवा. त्याचबरोबर बालसहित्यात भाषा आणि रेषांचा मिलाफ हवा. असे मत प्रसिद्ध चित्रकार आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ल. म. कडू यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्यावतीने आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत नव लेखकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
‘बालकुमारांसाठी लेखन’ हा कार्यशाळेचा विषय होता. ल. म. कडू आणि कवयित्री डॉ संगीता बर्वे यांनी सहभागीना मार्गदर्शन केले.
कडू म्हणाले, ‘मनोरंजन हाच बालसाहित्याचा मुख्य हेतू असला पाहिजे. सतत संस्काराचा आणि उपदेशाचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी लेखन करू नये. बहुतेक लेखन कुमारांसाठी केले जाते. शिशुगटालाही खेळणी ऐवजी पुस्तकात रमविले पाहिजे.’
डॉ. बर्वे म्हणाल्या, ‘बालकुमारांसाठी लिहिणाऱ्या लेखकांनी मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहिले पाहिजे. मुलांच्या सुखदुःखाशी एकरूप झाले पाहिजे. शब्दांच्या खेळातून भाषेची गम्मत मुलांना समजली पाहिजे.’









