प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय कुटुंब कल्याण खात्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण कर्नाटकामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण 50 टक्क्मयांनी कमी झाले आहे. 2005-06 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार 50.1 टक्के महिलांचा विवाह त्या 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच झाला आहे. 2015-16 च्या अहवालानुसार हे प्रमाण 24.8 टक्क्मयांनी कमी झाले होते, हे ग्रामीण भागाचे निरीक्षण आहे.
मात्र शहरी भागामध्ये 2005-06 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार बालविवाह होण्याचे प्रमाण 28.5 होते. ते आता म्हणजे 2019-20 मध्ये 21.3 टक्के झाले आहे. तज्ञांच्या मते बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंमलात आल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. जागृती मोहीम, स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण, चाईल्ड हेल्पलाईन व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱयाची नेमणूक यामुळे हे प्रमाण कमी झाले आहे.
यापुढे बालविवाह रोखण्यासाठी ग्राम पंचायत सदस्यांना सक्रिय केले जाणार आहे. ग्राम पंचायतीच्या सदस्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारणतः 16 ते 18 या वयोगटात मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या वेळेला मुली शाळेपासून दूर असतात आणि पुढे शिकण्यासारखी परिस्थिती नसते. त्यामुळे त्यांचे विवाह करून दिले जातात. त्यामुळे आता ग्राम पंचायत सदस्यांना प्रशिक्षण देऊन बालविवाह रोखण्यासाठी मदत घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागात अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यिकांना प्रत्येक घराची माहिती असते. त्यांच्याकडूनही बालविवाह रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाईल, असे बालहक्क ट्रस्टचे संचालक वासुदेव शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.









