वार्ताहर / अथणी
येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना सुविधा पुरवा, कोविड वार्डात वैद्याधिकारी, डॉक्टर, परिचारिकांनी वेळेत हजर राहताना सेवा पुरवाव्यात. सर्व अधिकाऱयांनी दक्ष राहिले पाहिजे. अंगणवाडी बालकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करावेत, असे आवाहन बेळगाव जिल्हा पंचायत सीईओ दर्शन यांनी केले. ते अथणी शासकीय रुग्णालयास अचानक भेट देताना येथील गैरसुविधांबाबत आरोग्याधिकाऱयांना धारेवर धरले. यावेळी त्यांच्या समवेत चिकोडीचे प्रांताधिकारी युकेशकुमार उपस्थित होते.
येथील कोविड वॉर्डात शासनाच्या नियमाप्रमाणे जेवण पुरविण्यात यावे, त्यासाठी शासन 260 रुपये देत आहे. कोविड वॉर्डात बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी आहे. परिसरात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथील लक्षणे आढळणाऱयांचे स्वॅब बेळगाव येथे तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यांचा अहवाल येण्यास विलंब होत आहे. त्यासाठी विशेष वाहनांची सोय करत सदर विलंब टाळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे जि. पं. सीईओंनी सांगितले. दरम्यान, शासकीय रुग्णालयात अचानक जि. पं. सीईओ दर्शन व प्रांताधिकारी युकेशकुमार यांनी भेट दिल्यानंतर यावेळी तेथील असुविधा व हलगर्जीपणा पाहून उपस्थित आरोग्य अधिकाऱयांना धारेवर धरले. कोरोना रुग्णांवर उपचार करताना निष्काळजीपणा केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.
अंगणवाडी-आशा
कार्यकर्त्यांना सूचना
तिसऱया टप्प्यात मुलांना कोरोनाचा मोठा धोका असल्याचे तज्ञांकडून वर्तविले जात आहे. यासाठी खबरदारी म्हणून आतापासूनच अधिकाऱयांनी दक्ष रहावे. आपल्या परिसरातील अंगणवाडीमधील बालकांना कोविडची लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित सरकारी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करावे. याबाबत अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यानंतर जि. पं. सीईओ व प्रांताधिकाऱयांनी ऐगळी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमर, ता. पं. अधिकारी रवी बंगारप्पा, ग्रेड टू तहसीलदार एम. व्ही. बिरादार, आरोग्याधिकारी बसगौडा कागे व कर्मचारी उपस्थित होते.









