मुंबई/प्रतिनिधी
राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. कडक निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता सर्व व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यवसाय आणि बार यांनाही याची झळ बसली असून, या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं. त्या पवारांनी वीज बिळात सवलत द्यावी अशी मागणी केली आहे. पत्राद्वारे केलेल्या यामागणीवरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांना टोला लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केलेल्या मागणीवरून ट्विट केलं असून, त्यांना टोला लगावला आहे. “शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो,” असा टोला भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.
शरद पवारांनी काय लिहलं आहे पत्रात
मुख्यमंत्र्यांनी ”एफएल-३ परवानाधारक हॉटेल-परमीटबार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपतकालीन पतरेखा हमी योजना क्र. १.० व २.० अंलता आणून सदर योजनेला दिनांक ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. ३.० योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात देखील उद्योग – व्यवसायाला संजिवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी.” असे शरद पवारांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
तसेच, आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे. असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.








