प्रतिनिधी/कोल्हापूर
मी जोपर्यंत बारमध्ये आहे तोपर्यंत बार चालू राहणार अशी दमदाटी करत बारमधील कर्मचाऱ्यास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना काल, रविवारी रात्री फुलेवाडी येथे घडली. याप्रकरणी शैलेश दिनकर पाटील (वय 25 रा. मूळगाव गुडाळ, ता राधानगरी सद्या हॉटेल ब्ल्यू नाईन बार ऍन्ड रेस्टॉरंट, फुलेवाडी, रिंगरोड) यांनी अमित देठे, मनोज बोडकेर (फुलेवाडी 6 नंबर बसस्टॉप) यांच्याविरुध्द करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत करवीर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शैलेश पाटील हा ब्ल्यू नाईन बार ऍन्ड रेस्टॉरंटमध्ये कामाला आहे. बार रात्री 9.30 वाजता बंद होतो. रविवारी रात्री मनोज बोडेकर हा त्या बारमध्ये आला होता. वेळ झाल्यानंतर फिर्यादी पाटील यांने बार बंद होत असल्याचे बोडेकर याला सांगितले. त्यावेळी बेडेकर यांने मी जोपर्यंत आहे तोपर्यंत बार चालू राहणार असे म्हणून अमित देठे याला फोन लावून बोलावून घेतले. हॉटेल बंद करत असताना देठे हा बळजबरीने हॉटेलमध्ये घुसला. यावेळी देठे यांने मी कोण आहे ते दाखवितो असे म्हणून पाटील याला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच तुझ्या बारचा हप्ता चालू करणार असे म्हणाला. असे फिर्यादीत म्हटले आहे. करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक मंत्रे तपास करीत आहेत.









