बार असोसिएशनच्या कमिटीत घेण्यात आला निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांचे अचानक निधन झाले. त्यानंतर बार असोसिएशन अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. या पदावर कुणाची नियुक्ती करायची याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर बार असोसिएशन कमिटीच्या सदस्यांनी बैठक घेवून एकमताने ऍड. दिनेश एम. पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली. याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
बार असोसिएशन कमिटीची मुदत दोन वर्षे असते. दोन वर्षानंतर पुन्हा निवडणूक घेतली जाते. जवळपास आता निवडणूक होवून एक वर्षे उलटले आहे. त्यामुळे आता आणखी एक वर्ष मुदत आहे. त्यामुळे बार असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक घेणे अवघड असल्यामुळे सर्वांशी विचारविनीमय करुन त्यानंतर बार असोसिएशनच्या कमिटीने हा निर्णय घेतला.
गेल्या काही दिवसांमध्ये अध्यक्षपदाबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अध्यक्षपदावर कुणाला नियुक्त करायचे याबाबतही विचारविनीमय सुरु होता. अखेर ऍड. दिनेश एम. पाटील यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कोरोना काळात बार असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेंटरी आर. सी. पाटील, जाईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, महिला प्रतिनिधी सरिता श्रेयेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









