प्रतिनिधी / बार्शी
काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी बार्शी शहर आणि तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला होता. बार्शी शहर आणि तालुक्यात या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले आहे. बार्शी शहराला काल तलावाचे स्वरूप आले होते. सर्वत्र रस्त्यावरती अगदी चार ते पाच फूट पाणी साचल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसलेले होते. आज सकाळपर्यंत या पाण्याचा निचरा होण्यास यश आले असून, बार्शी शहरातील सर्व पाणी आता कमी झालेले आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र अजूनही परिस्थिती तशीच आहे. बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी अजूनही साचून आहे. तर तालुक्यातील सर्व तलाव लघु मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वाहत असून तालुक्यातील जवळपास पाच तलाव पाणी जास्त झाल्याने फुटलेले आहेत.
तालुक्यातील आळजापूर, कळंबवाडी, मिरजनपूर, मालेगाव , लांडोळे या गावातील पाझर तलाव पाणी जास्त झाल्याने व क्षमते बाहेर पाणी गेल्याने फुटलेले आहेत. हे पाच तलाव अचानक फुटल्याने तलावाखालील गावांना पाण्याने वेढले आहे. या तलावांच्या बाजूने असणारी सर्व शेती पाण्याखाली गेली असून शेतीच्या किमान दोन ते तीन फूट असे पाणी साचले आहे. या पाच गावातील व परिसरातील शेतकर्यांचे नुकसान झाले असून त्यात अनेक शेतकऱ्यांचे ऊस आडवे पडलेले आहेत. सोयाबीन तूर, मका, कांदा ही सर्व पिके पाण्याखाली असून नष्ट झालेली आहेत. तसेच हिंगणी चा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने त्या खालील गावे सुद्धा पाण्यात गेलेले आहेत.
तालुक्यातील जवळपास वीस गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून त्याचा मुख्य तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम काल रात्री पासूनच प्रशासनाने हाती घेतली असून लाईफ बोट व राष्ट्रीय आपत्ती फोर्स चे जवान बार्शी दाखल झाले आहेत. बार्शी तालुका पोलीस स्टेशन , बार्शी तहसील कार्यालय व अनेक सामाजिक संस्था यांच्यावतीने हे बचाव कार्य चालू असून सर्व ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने चालू आहे.
तसेच बार्शी तालुक्यातील अनेक पूल या पावसाने वाहून गेले असून त्यापैकी बार्शी तुळजापूर रोडवर कदम वस्ती या ठिकाणी असणारा पूल पूर्णपणे वाहून गेला आहे तसेच अनेक ठिकाणी बंधारे सुद्धा वाहून गेले असून बार्शी तुळजापूर रोड वरील शेलगाव (मा) या ठिकाणी असणारे बंधारे तसेच कासारवाडी शिवारामध्ये भोगावती नदीवर असणारे बंधारे वाहून गेलेले आहेत. पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून बार्शी -तुळजापूर , बार्शी -भूम ,बार्शी तुळजापूर अशी वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बार्शी तहसील कार्यालयामध्ये प्रांत अधिकारी हेमंत निकम , आमदार राजेंद्र राऊत व सर्व अधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीत सूचना देण्यात आले की नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा.
Previous Articleपंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
Next Article वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; खोची बंधारा पाण्याखाली









