बार्शी / तरुण भारत संवाद प्रतिनिधी:
कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. मात्र, दुसरीकडे बार्शीतील काही मेडिकल दुकानांतून या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, एका स्टिंग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे. शहरातील तुळशीराम रोडवरील विक्रांत शहा यांच्या रुग्णालयातील मेडिकलमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यासंदर्भात आज अन्न व औषध प्रशासन व बार्शी तहसील कार्यालयाने या ठिकाणी तपासणी करून शहा मेडिकल सील केले आहे. या मेडिकलचे फार्मासिस्ट अक्षय लोंढे यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.
यात सविस्तर माहिती अशी की राजन ठक्कर या व्यक्तीने आपल्या दुकानातील एक व्यक्तीला रेमेडेसिव्हीर इंजेक्शन आणण्यासाठी येथील मेडिकल दुकानात पाठवले होते. त्यावेळी, सर्वप्रथम नाही असे सांगण्यात आले. मात्र, पुन्हा 4 हजार रुपयांना इंजेक्शन मिळेल असे सांगितले. विशेष म्हणजे कुठल्याही डॉक्टरची चिठ्ठी नसून साध्या कागदावर हे इंजेक्शनची मागणी केली होती. तरीही, येथील मेडिकल दुकानदाराने 4 हजार रुपये घेऊन हे इंजेक्शन ब्लॅकने दिलं आहे. विशेष म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार 1500 ते 1700 रुपयांपेक्षा जास्त दराने हे इंजेक्शन विकता येत नाही, असे राजन ठक्कर यांनी म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही त्यांनी बनवला आहे. या घटनेमुळे बार्शी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात होणारा काळाबाजार उघडकीस आला आहे. यासंदर्भात तहसिलदार आणि अन्न व औषध प्रशासन अधिकारी वाघमारे यांनी हे मेडीकल सिलकेले असून येथील कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत.
ही मेडिकल कामगारांची चूक – डॉ. विक्रांत शहा
माझ्या दवाखान्याच्या आवारात असलेल्या मेडिकलमधून रेमडेसिव्हीर इंजेक्शन जादा दराने विक्री झाल्याचे मला रात्री उशिरा एका व्हिडिओ मधून कळाले, मी काल दिवसभर कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. तसेच माझी पत्नी सुद्धा कामानिमित्त बाहेर होती, तेव्हा माझ्या मेडिकलमधून माझ्या अनुपस्थितीत हा काळाबाजार झाला असावा. तसेच ज्या कामगारांनी ही केले आहे त्यास कडक शासन झाले पाहिजे. शहा रुग्णालय हे आम्ही गेली वीस वर्षे बार्शीत चालवत आहोत वीस वर्षात कोणतीही चूक अनावधानाने सुद्धा आमच्याकडून घडली नाही. रुग्णसेवा ही आमच्या दोघांच्याही आयुष्याचे ध्येय आहे. त्यामुळे असा काळाबाजार आम्ही करणे तर शक्यच नाही. ती मेडिकल कामगारांनी केलेले चूक आहे किंवा माझ्या काही प्रतिस्पर्धी लोकांनी यात काही काळभेर केल आहे हे तपासणे गरजेचे आहे.









