कोविड नियमावलीचे पालन करून शाळा सुरू, शहरी भागात टप्प्या टप्प्याने तर ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांना प्रवेश

प्रतिनिधी /म्हापसा
बार्देश तालुक्यात जवळपास दोन वर्षाच्या कालावधीनंतर सोमवारी शाळा गजबजल्या. इतक्या दिवसानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपले शालेय जीवन पहायला मिळाले. त्यांच्या चेहऱयावरही आनंद पहायला मिळाला. कोविड काळ असूनही पालक व शिक्षक वर्गाने सरकारच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. अवघा महिनाभर का असेना अखेर शाळा सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोविडच्या नियमावलीनुसार 50 टक्के विद्यार्थ्यांना वर्गात घेतले. सकाळी वर्गाबाहेर थर्मल गन व सॅनिटायझर लावून वर्गात प्रवेश दिला. दररोज वर्गामध्ये सॅनिटायझेशन करण्यात येईल, अशी माहिती शाळा व्यवस्थापनांनी दै. तरुण भारतकडे बोलताना दिली.

कोविड महामारीने दिलेल्या 2 वर्षाच्या सक्तीच्या सुट्टीनंतर सोमवार दि. 21 फेब्रुवारीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. यावेळी शाळांना कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. गावातील शाळात या पूर्ण क्षमतेसह भरल्या आहेत तर शहरातील वर्ग 50 टक्के क्षमतेसह भरले आहेत. वर्ग ऑफलाईन पद्धतीत सुरू करण्याच्या शिक्षण खात्याच्या आदेशाची सोमवारपासून अंमलबजावणी झाली आहे. कोविड नियमांचे पालन करून वर्ग सुरू करण्यात यावेत असे शिक्षण खात्याच्या परिपत्रात म्हटले होते. शहरातील विद्यालयात जास्त विद्यार्थी असल्यामुळे पटसंख्येच्या निम्म्या विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवारी घेतले तर निम्म्या विद्यार्थ्यांचे आज मंगळवारी घेण्यात येतील. या पद्धतीने एका विद्यार्थ्याला आठवडय़ातून तीन दिवसच यावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यालयात मात्र विद्यार्थ्यांची संख्याच कमी असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण क्षमतेसह म्हणजेच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन वर्ग भरवू शकतील. ऑफलाईन वर्ग सुरू करताना पालकांची परवानगी घेणे आवश्यक असल्याची अटही आहे. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसात अनेक विद्यालयांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकांशी संवाद साधला होता. पालक ऑफलाईन वर्गासाठी केवळ राजीच आहेत असे नव्हे तर आतुरही आहेत असे आढळून आल्याची माहिती काही मुख्याध्यापकांनी दिली.
टप्प्या टप्प्याने वर्ग सुरू करणार : रामनाथ बुर्ये

दोन वर्षानंतर शाळा सुरू होते ही खूप आनंदाची गोष्ट आहे. व्यवस्थापनही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करते. सारस्वत विद्यालयाने कोविडसंबंधी काही नियम घातले आहेत. पाचवी ते आठवीचे वर्ग सोमवारपासून 50 टक्के क्षमतेने घेण्यात येतील. मात्र नववी व दहावीचे विद्यार्थी दररोज येणार आहेत. बुधवारी आम्ही सुट्टी दिली असून गुरुवारपासून परीक्षा सुरू होत आहेत. शनिवारपर्यंत असेच सुरू राहणार असून सोमवारपासून पूर्णतः शाळा सुरू होणार आहे. 2 मार्चला शाळेचा वर्धापनदिन असून त्यानंतर शाळा सर्वांसाठी खुली असेल, असे खोर्ली म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाचे चेअरमन रामनाथ बुर्ये यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार : ऍड. महेश शेटगांवकर

आजपासून शाळा सुरू झाल्या ही आनंदाची गोष्ट आहे. कोविडचे पालन करून शाळा सुरू ठेवाव्यात. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. ऑनलाईन वर्गाचा विद्यार्थ्यांना त्रास होत होता. मात्र आता ऑफलाईनमुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार, असे पालक ऍड. महेश शेटगांवकर म्हणाले.
गणित व विज्ञानाचा दर्जा सुधारणार : देश किनळेकर

सरकारने शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या शालेय भवितव्यास सुरुवात केली आहे. नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. शाळा बंद होत्या त्यावेळी विद्यार्थी मोबाईलमध्येच गुंतले होते. आता विद्यार्थ्यांचा संवाद शिक्षकांकडे थेट होणार व विद्यार्थी आपल्या समस्या शिक्षकांना सांगून अभ्यासाच्या माध्यमातून त्या सोडविणार. गणित व विज्ञानाचा दर्जा सुधारणार यात शंका नाही असे पालक देश किनळेकर म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम : गुरुदास पालकर

सरकारी परिपत्रकाप्रमाणे आम्ही सोमवारपासून 50 टक्के हजेरीनुसार वर्ग सुरू केले. कोविड नियमावलीचे आम्ही पालन केले आहे. 22 मार्च 2020 रोजी बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू होत आहेत. शाळेत वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतील. गणवेशाची सध्या गरज नाही, आज शाळा खऱया अर्थाने शाळा कशा दिसल्या. विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहे. शाळा पूर्वीसारख्या सुरू राहणार आहेत, असे ज्ञानप्रसारक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुदास पालकर म्हणाले.
विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा : सुजीत तिवरेकर

शाळा सुरू केल्याबद्दल आपण सरकारचे आभार मानतो. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागणार आहे. त्यांच्या शिक्षणातही सुधारणा होईल. सर्वांनी कोविड नियमावलीचे पालन करावे, तसेच विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा असे खोर्ली म्हापसा येथील पालक सुजीत सुहास तिवरेकर म्हणाले.









