15 दिवस लॉकडाऊन करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी / म्हापसा
राज्य सरकारने लागू केलेल्या 3 दिवशीय लॉकडाऊन व जनता करफ्यूला बार्देश तालुक्यातून उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. सर्वांनी आपापली दुकाने बंद करून लॉकडाऊनचे पालन करीत घरी राहणे पसंत केले. म्हापशात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वृत्तपत्रे विक्रेते, फार्मसी व सकाळी दूध दुकान वगळता सर्वत्र कडक बंद पाळण्यात आले होते. महाभयंकर कोरोना या महामारी रोगापासून दूर होण्यासाठी सरकराने 3 दिवस नाही तर निदान 15 दिवस बंद पाळणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. जनतेने मुख्यमंत्र्यांच्या या लॉकडाऊन आदेशाचे स्वागत केले आहे मात्र हे लॉकडाऊन महिन्या दिवसापूर्वी झाले असते तर आज राज्यात कोरोनाचे चित्र राज्यात वेगळे असते अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
जो तो सरकारकडे पैसे मागू लागला- नंदू धावस्कर
म्हापसा येथील बलभीम हॉटेलचे मालक नंदू धावसकर म्हणाले की, राज्यात लॉकडाऊन झाले ही चांगली गोष्ट आहे. मात्र हे लॉकडाऊन तर पूर्वी व्हायला पाहिजे होते. पुर्वी लॉकडाऊन झाले होते त्यातच वाढ केली असती तर बरे झाले असते. आज लोकांच्या जीवासाठी आज कोरोना भयानक झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी जे आज काय केले आहे ते चांगले आहे. लॉकडाऊन केल्यापासून सर्व धंदा करणाऱयांना त्रास झालेला आहे. जो तो सरकारकडे पैसे मागू लागला आहे. सर्व बंद असताना असे मागणे चुकीची गोष्ट आहे. सरकार म्हणजेच आम्ही आहे असे ते म्हणाले.
काळजी घेऊन घरीच रहा- गजानन लिंगुडकर
गजानन लिंगुडकर म्हणाले की, हे पूर्वी केले असते तर अधिक बरे झाले असते. सर्वांनी आपापली काळजी घेऊन घरी राहणे चांगली गोष्ट आहे. सरकारने लॉकडाऊन केले त्याचे स्वागत आहे मात्र यात वाढ करून आम्ही सर्वांनी कोरोना महाभयंकर रोग दूर करावा जेणेकरून राज्यातील सर्व नागरिक तंदुरुस्त राहणार असल्याचे लिंगुडकर यांनी सांगितले.
लॉकडाऊनची माहिती 8 दिवसापूर्वीच द्या- आनंद धावस्कर
आनंद धावस्कर म्हणाले की, लॉकडाऊन होणार याची माहीती पूर्वी द्यायला पाहिजे. आठ दिवस तुम्हाला देतो तुम्ही अत्यावश्यक वस्तू आणून ठेवा आम्ही कडकरीत्या बंद करणार आहोत असे सांगयाला पाहिजे जेणेकरून लोक गर्दी करणार नाही. काल दिवसभर चतुर्थीला गर्दी होत नाही त्यापेक्षा अधिक झुंबड बाजारात अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी झाली. यात कोविड रुग्ण असेल तर त्याला जबाबदार कोण अन्यथा आम्हाला परिणाम भोगावाच लागेल असे आनंद धावस्कर म्हणाले.
वृत्तपत्रे सकाळी लवकर घेऊन जा-गोरखनाथ नाईक
म्हापसा येथील पेपर एजंट गोरखनाथ नाईक म्हणाले की, लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत कोण दिसत नाही. उद्या पेपर येणार आहे. सर्वांनी लवकर पेपर घेऊन जावे. लॉकडाऊन केले ही चांगली गोष्ट आहे. हे तीन दिवस न करता 15 दिवस करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोना रोग दूर होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
लॉकडाऊन महिन्यापूर्वीच अपेक्षित होते- उल्हास रायकर
उल्हास रायकर म्हणाले की, उशीरा का होईना सरकारला अखेर जाग आली. आमचा जीव महत्त्वाचा आहे. लॉकडाऊन करण्यास सरकारने खूप उशीर केला. हे महिन्यापूर्वीच झाले पाहिजे होते. सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी. 3 दिवस घरीच राहून लॉकडाऊनला मदत करावी व एकमेकांना सहाय्य करावे असे ते म्हणाले.
म्हापसा गांधी चौकात कडक पोलीस तपासणी
सकाळी 7 वाजल्यापासूनच म्हापसा गांधी चौकात म्हापसा पोलिसांनी दोन्ही बाजूला गराडा घालून कडक पोलीस तपासणी करण्यास सुरुवात केली होती. जास्त गाडय़ा वेर्णा कंपनीमध्ये कामाला जाताना आढळून आले. पोलिसांनी त्याची चौकशी करून योग्यरीत्या तपासणी करून त्यानंतर सोडून दिले.
म्हापसा बाजारपेठ पूर्णतः बंद
म्हापसा बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. म्हापसा बाजारातील दुकाने, म्हापसा मासळी मार्केट, म्हापसा भाजी मार्केट पूर्णतः बंद होते. सकाळी 7.30 वाजेपर्यंत आजुबाजूचे मयडा, बस्तोडा, थिवीचे काही नागरिक गावठी भाजी, कोळंबी घेऊन आले होते. ग्राहकांनी झुंबड घातल्याने ती अवघ्या 15 मिनीटात संपल्याचे पहायला मिळाले. हॉटेल्स पूर्णतः बंद होती. बाजारपेठेत अवघ्या दोन फार्मसी व वृत्तपत्र विक्रेते वगळता सर्वत्र सामसुम होते.
बार्देशात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त
कळंगूट येथे या प्रतिनिधीनी फेरफटका मारला असता समुद्रावर कुणीच नव्हते. त्या भागातील सर्व दुकाने पूर्णतः लॉकडाऊन केल्याचे पहायला मिळाले. हडफडे येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. थिवी रेल्वे स्थानकावरही पोलीस बंदोबस्त होता. थिवी अस्नोडा मार्गावर काही खाणीचे ट्रक सुरू आहे अशा अफवा पसरल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली मात्र तसे काही आढळून आले नाही. शिवोली हणजूण, पर्वरी भागात रस्त्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









