वृत्तसंस्था/ मियामी
येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात ग्रीकचा स्टिफेनोस सिटसिपेस आणि रशियाचा रुबलेव्ह यांनी विजय नोंदविले. तर महिला विभागात ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड बार्टीने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. रुमानियाच्या हॅलेपने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
पुरुष एकेरीच्या शनिवारी झालेल्या सामन्यात ग्रीकच्या द्वितीय मानांकित सिटसिपेसने बोस्नियाच्या झुमुरचा 6-1, 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड ज्योकोविक तसेच स्पेनचा नादाल, ऑस्ट्रियाचा थियेम, स्वीसचा फेडरर आणि ब्रिटनचा अँडी मरे सहभागी झालेले नाहीत. सिटसिपेसचा पुढील फेरीतील सामना जपानच्या निशिकोरीशी होणार आहे. निशिकोरीने स्लोव्हेनियाच्या बिडेनीचा 7-6 (8-6), 5-7, 6-4 असा पराभव केला. रशियाच्या चौथ्या मानांकित आंदे रुबलेव्हने अमेरिकेच्या सँडगेनवर 6-1, 6-2 अी मात केली. कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हने इव्हास्काचा 6-7 (5-7), 6-4, 6-4 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. रशियाच्या टॉप सीडेड मेदव्हेदेवने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठताना तैवानच्या हेसनचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या सामन्यात मेदव्हेदेवने नऊ बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या पॉपरीनने अमेरिकेच्या ओपेल्कावर 6-4, 6-2 असा विजय मिळविला.
महिला एकेरीच्या शनिवारी झालेल्या तिसऱया फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने लॅटिव्हियाच्या ओस्टापेन्कोचा 6-3, 6-2 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. बार्टीचा चौथ्या फेरीतील सामना बेलारुसच्या माजी टॉप सीडेड अझारेन्काशी होणार आहे. बेलारुसच्या अझारेन्काने जर्मनीच्या केर्बरवर 7-5, 6-2 अशी मात करत पुढील फेरी गाठली आहे. रुमानियाच्या हॅलेपने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. रुमानियाच्या हॅलेपने माघार घेतल्याने सेव्हास्टोव्हाला चौथ्या फेरीसाठी पुढे चाल मिळाली आहे. क्रोएशियाच्या कोंजुने पोलंडच्या स्वायटेकवर 6-4, 2-6, 6-2 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









