पेगुला, पेसिकोव्हा, शॅपोव्हॅलोव्ह, गेल मोनफिल्स स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया स्पेनच्या राफेल नदालने आणखी एका जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली असून त्याने कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. इटलीच्या बेरेटिनीनेही शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. महिलांमध्ये अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने तसेच अमेरिकेच्या मॅडिसन कीजने शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. शॅपोव्हॅलोव्हप्रमाणे गेल मोनफिल्स, जेसिका पेगुला, चौथी मानांकित बार्बोरा क्रेसिकोव्हा यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
सहाव्या मानांकित नदालने चौदाव्या मानांकित शॅपोव्हॅलोव्हवर चार तास आठ मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीत 6-3, 6-4, 4-6, 3-6, 6-3 अशी मात केली. नदालने आत्मविश्वासपूर्वक सुरुवात करीत पहिले दोन सेट घेतले. ही लढत तो सहजपणे जिंकणार असे वाटत असतानाच शॅपोव्हॅलोव्हने नंतरचे दोन सेट्स जिंकत बरोबरी साधली. निर्णायक पाचव्या सेटमध्ये नदालने पहिल्या गेममध्ये एक ब्रेकपॉईंट वाचविला तर तिसऱया गेममध्येही दोन ब्रेकपॉईंट वाचवले. या गेममध्ये तीनदा डय़ूस झाल्यानंतर नदालने 3-0 अशी आघाडी घेतली. शॅपोव्हॅलोव्हने नंतर तीन गेम जिंकले. पण नदालने 6-3 असा हा सेट घेत उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले.
बेरेटिनीचाही विजयासाठी संघर्ष

अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात इटलीच्या सातव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीलाही उपांत्य फेरी गाठण्यासाठी 3 तास 49 मिनिटे पाच सेट्सचा संघर्ष करावा लागला. त्याने फ्रान्सच्या झुंजार लढत देणाऱया गेल मोनफिल्सवर 6-4, 6-4, 3-6, 3-6, 6-2 अशी मात करून आगेकूच केली. ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठणारा तो इटलीचा पहिलाच टेनिसपटू आहे. गेल्या वर्षी त्याने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. त्याची उपांत्य लढत राफेल नदालशी होणार आहे.
ऍश्ले बार्टीची पेगुलावर मात
महिला एकेरीत अग्रमानांकित ऍश्ले बार्टीने विजयी घोडदौड कायम राखताना 21 व्या मानांकित जेसिका पेगुलाचा केवळ 63 मिनिटांच्या खेळात 6-3, 6-0 असा धुव्वा उडविला. चौथ्यांदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठताना यावेळी बार्टीने आतापर्यंतच्या पाच सामन्यात केवळ 17 गेम्स गमविले आहेत. ही स्पर्धा जिंकणारी ती दुसरी ऑस्ट्रेलियन खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी 1978 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस ओनीलने येथे जेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत तिने दुसऱयांदा उपांत्य फेरी गाठली आहे. गुरुवारी तिची उपांत्य लढत मॅडिसन कीजशी होणार आहे.
मॅडिसनकडून पेसिकोव्हाला धक्का
रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या सामन्यात मॅडिसन कीजने झेकच्या चौथ्या मानांकित बार्बोरा क्रेसिकोव्हाचे आव्हान दीड तासाच्या खेळात संपुष्टात आणले. दोघींमध्ये झालेली ही पहिली लढत कीजने 6-3, 6-2 अशी जिंकली. पेसिकोव्हाने प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरी व महिला दुहेरी अशी दोन अजिंक्यपदे मिळविली होती. मॅडिसनने पाचव्यांदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली असून यापूर्वी 2018 मधील अमेरिकन ओपनमध्ये तिने उपांत्य फेरी गाठली होती. 2015 मध्ये तिने येथील स्पर्धेत पहिल्यांदा उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते.
सानिया मिर्झाचा ऑस्ट्रेलियन ओपनला निरोप

भारताची महिला टेनिसस्टार सानिया मिर्झाचा मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाल्यानंतर तिने या स्पर्धेचा निरोप घेतला. या वर्षाच्या टेनिस हंगामानंतर निवृत्त होणार असल्याचे तिने जाहीर केले असल्याने तिची ही शेवटची ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा ठरली. मिश्र दुहेरीत ती राजीव रामसमवेत खेळत होती. त्यांना वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या जेमी फोर्टिस व जेसन कुबलर यांच्याकडून 4-6, 6-7 असा पराभव स्वीकारावा लागला. दीड तास ही लढत रंगली होती.
35 वर्षीय सानिया ही भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू असून तिने कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली, त्यात तीन मिश्र दुहेरीच्या जेतेपदांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात महिला दुहेरीत तिला येथे पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मिश्र दुहेरीत दुसऱयांदा ही स्पर्धा जिंकून विजयी सांगता करण्याचे तिचे स्वप्न होते. पण ते साकार होऊ शकले नाही. मेलबर्न पार्क हे तिच्यासाठी यशस्वी मैदान ठरले आहे. सहापैकी दोन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे तिने याच ठिकाणी मिळविली आहेत. 2009 मध्ये तिने महेश भूपतीसमवेत मिश्र दुहेरीचे तर 2016 मध्ये स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससवेमत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले हेते. हेच तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम जेतेपदही ठरले. सानियाच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.









