काँग्रेसच्या 10 तर मगोच्या 2 आमदारांचा समावेश : सुनावणी मुदतवाढीसाठी दोन याचिका सादर
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले 10 आमदार व मगो पक्षातून फुटून बाहेर पडलेले 2 मिळून एकूण 12 आमदारांच्या भवितव्याचा फैसला सर्वोच्च न्यायालय ठरविणार आहे. दोन महिन्यापूर्वी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी दाखल केलेल्या याचिकांवर आज मंगळवारी दु. 12.30 वा. सुनावणी होणार आहे.
काँग्रेसच्यावतीने कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. सभापती राजेश पाटणेकर यांनी आणखी 2 आठवडय़ांची मुदत मागितली आहे तर आमदार विल्प्रेड डिसा (नुवे) यांच्या नावाने एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून कोविडमुळे 1 महिना सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेस, मगोच्या याचिकांवर सुनावणी
सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर बाराही आमदारांच्या अपात्रतेसाठी काँग्रेस व मगो पक्षाच्यावतीने दोन स्वतंत्र याचिका सादर केल्या होत्या. सभापतींसमोर सुनावणीस दिरंगाई होत असल्याच्या सबबीखाली मगोच्यावतीने सुदिन ढवळीकर यांनी तर काँग्रेसच्यावतीने गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यासाठी दोघांनी स्वतंत्र याचिका सादर केल्या होत्या. त्यावर आज दोन महिन्यानंतर सुनावणी होत आहे.
घटनेतील तरतुदीचे आमदारांकडून उल्लंघन
दोन्ही नेत्यांनी आपल्या प्नाक्षात फूट पडलेली नाही, असे स्पष्टीकरण पुराव्यांसह सादर केलेले आहे. पक्षांतर बंदी कायद्यात पक्षातील फूट स्पष्ट केलेली आहे. 2 तृतियांश सदस्य व विधीमंडळ सदस्य हे थेट एका पक्षाचे दुसऱया पक्षात विलिनिकरण करू शकतात. घटनेमध्ये ही जी तरतूद आहे तिचे काँग्रेसच्या 10 जणांनी व मगोच्या 2 आमदारांनी उल्लंघन केल्याचा दावा याचिकादारांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला आहे.
सभापतींना त्वरित या विषयावर सुनावणी घेऊन त्याबाबतीत निर्णय घेण्यास भाग पाडावे तसेच सभापतींनी निवाडा देईपर्यंत मणिपूरच्या धर्तिवर या सर्व आमदारांचे व मंत्र्यांचे अधिकार काढून घेण्यात यावे, अशी मागणी याचिकादारांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
भापतींनी मागितली दोन आठवडय़ांची मुदत
सभापती राजेश पाटणेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन मुद्दे मांडले आहेत. कोविड 19 मुळे सुनावणी घेणे शक्य झाले नाही व त्यानंतर दुसरा एक मुद्दा मांडलेला आहे त्यानुसार काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावयाची असल्याने दोन आठवडय़ांची मुदत वाढवून द्यावी, तोपर्यंत सुनावणी पुढे ढकलावी.
क्लिवोफात ऐवजी डिसा यांचे नाव प्रतिज्ञापत्रात
आणखी एक प्रतिज्ञापत्र 10 जणांच्यावतीने सादर करण्यात आले असून त्यात कुंकळ्ळीचे आमदार क्लिवोफात डिसोझा हे कोरोनाबाधित सापडल्याने सुनावणी 1 महिना पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. मात्र क्लिवोफात ऐवजी विल्फेड डिसा (नुवे) यांचे नाव टाकण्यात आल्याने प्रतिज्ञापत्रातच थोडा गोंधळ आहे. आज या विषयावर प्रत्यक्षात जेव्हा सुनावणी होणार त्यावेळी नेमके काय होईल याकडे राज्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे. बाराहीजण भाजपमध्ये रुजू झालेले आहेत. त्यातील दोघे उपमुख्यमंत्री आहेत तर उर्वरित चारजण मंत्री आणि एक आमदार उपसभापती बनला आहे. एकूण गोव्याच्या एक डझन आमदारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात आजपासून होणाऱया सुनावणीवर अवलंबून आहे.









