कमी दिवसात विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासाचे आव्हान पेलावे लागणार : 24 मे ते 10 जून दरम्यान परीक्षा होणार
प्रतिनिधी / बेळगाव
करिअरची वाटचाल असणारे बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. मात्र तब्बल सात ते आठ महिने विलंबाने सदर शैक्षणिक वर्ष सुरू झाले. यामुळे कमी दिवसात विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासाचे आव्हान पेलावे लागणार आहे.
बारावीची अंतिम परीक्षा मे महिन्यात होणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. यामुळे दडपण न घेता परीक्षेची पूर्वतयारी करणे गरजेचे असून महाविद्यालयीन स्तरावर विशेष लक्ष दिले जात
आहे.
2020-2021 या शैक्षणिक वर्षाला विलंबाने सुरुवात झाली. मे महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरू झाले. मात्र तत्पूर्वी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत होते. सदर पद्धतीचा लाभ शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळत होता. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित होते. यामुळे महाविद्यालये सुरू होताच नियम-अटींसह महाविद्यालयात येणाऱयांची संख्या वाढली असून तीन-चार महिन्यांत अभ्यास करण्यासाठी कसरत करावी लागणार
आहे.
दरवर्षी बारावीचे शैक्षणिक वर्ष मे महिन्यात जरी सुरू होत असले तरी तत्पूर्वी महाविद्यालयात जादा तासिकांच्या माध्यमातून पाठय़क्रम शिकविला जातो. यामुळे अचूक नियोजन, अभ्यासक्रमाची विभागणी, उजळणीचे वेळापत्रक, सराव परीक्षांकडे कल यांच्या माध्यमातून परीक्षेचे आव्हान पेलले जाते. मात्र यंदा सर्व लॉकडाऊन झाल्याने नियोजनदेखील लॉक झाले. मात्र सध्या अभ्यासक्रम पूर्ततेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे कल आहे. यामुळे एरव्ही महाविद्यालयांना दांडी मारणारे विद्यार्थी देखील तासिकांचा लाभ घेत आहेत.
अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागणार
कोरोनामुळे महाविद्यालये विलंबाने सुरू झाली आहेत. यामुळे अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. 70 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा पार पडणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार आहे. मात्र निकालावर परिणाम होऊ नये यासाठी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अभ्यासक्रमाची पूर्तता होऊन पूर्वपरीक्षा, सराव परीक्षा घेतली जाते. मात्र यंदा सदर वाटचाल कोरोनामुळे खंडित झाली असून दि. 24 मे ते 10 जून दरम्यान परीक्षा होणार आहे.









