शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची घोषणा : परीक्षेविषयीचा संभ्रम दूर : दहावी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात घेणार
प्रतिनिधी / बेंगळूर

कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, दहावीची परीक्षा जुलैच्या तिसऱया आठवडय़ात घेण्यात येणार आहे. दहावी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बहुपर्यायी स्वरुपातील प्रश्नपत्रिका असणार आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून श्रेणी स्वरुपात गुण दिले जाणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी शुक्रवारी सकाळी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे परीक्षा होणार की नाही, या उलटसुलट चर्चेवर पडदा पडला आहे.
केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, हरियाणा, गुजरात यासह इतर राज्यांनीही तेथील परीक्षा रद्द करण्यासंबंधीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातीलही दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागल्याने शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. बारावीची परीक्षा रद्द करण्यात येत असून या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. त्यांना अकरावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. जर या निकालावर विद्यार्थी संतुष्ट नसतील त्यांच्यासाठी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात येईल. यासंबंधी मार्गसूची जारी करण्यात येईल, अशी माहिती दिली.
रिपीटर, बहिस्थना परीक्षा अनिवार्य
2020-21 या शैक्षणिक वर्षात बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी (रिपीटर) आणि बहिस्थ विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र, योग्य कागदपत्रे नसल्याकारणाने सरसकट उत्तीर्ण केले जाणार नाही. त्यांना आगामी दिवसांत होणाऱया परीक्षेसाठी हजर व्हावे लागेल, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दहावी विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करणे अशक्य
दहावी विद्यार्थ्यांना परीक्षेविना श्रेणीच्या स्वरुपात निकाल देऊन उत्तीर्ण करणे शक्य नाही. कारण 2019-20 या शैक्षणिक वर्षात नववीच्या परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अनिवार्य कारणास्तव कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जुलैच्या तिसऱया किंवा शेवटच्या आठवडय़ात दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात निकाल जाहीर करण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक 20 दिवस अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षा घेतली तरी कोणालाही नापास (अनुत्तीर्ण) केले जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दहावी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात (मल्टिपल चॉईस) असणार आहे. तर तिन्ही भाषा विषयांची एक प्रश्नपत्रिका आणि ऐच्छिक विषय (कोअर सब्जेक्ट) गणित, विज्ञान, समाज या विषयांची एक प्रश्नपत्रिका असणार आहे. ऐच्छिक विषय गणित, विज्ञान आणि समाज विषयांची प्रत्येकी 40 गुणांप्रमाणे एकूण 120 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे असतील. त्यातील एक उत्तर विद्यार्थ्यांना निवडावे लागेल. या परीक्षेसाठी 3 तासांचा वेळ असणार आहे. विद्यार्थी गोंधळात पडतील असे प्रश्न नसतील. साधे आणि सोप्या प्रश्नांचा समावेश प्रश्नपत्रिकेत असेल. भाषा विषयाच्या परीक्षेसाठीही हेच तत्व लागू असणार आहे. भविष्यात बारावीत सायन्स, आर्ट्स, कॉमर्समध्ये विषयांची निवड करण्यासाठी अनुकूल व्हावे यासाठी परीक्षा घेणार असल्याची माहितीही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर येणाऱया विद्यार्थ्यांना एन-95 मास्क देण्यात येतील. परीक्षेला 8.75 लाख विद्यार्थी हजर होणार असून त्यासाठी 6 हजार परीक्षा केंद्रे निवडण्यात आली आहेत. प्रत्येक खोलीत 10 ते 12 विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था असेल. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल. सुरक्षा आणि कोविड मार्गसूचीचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येईल. अन्यत्र स्थलांतर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते असलेल्या ठिकाणीच परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे. तर परीक्षा केंद्रातील सुपरवायझर, परीक्षा निरीक्षकांचे लसीकरण केले जाईल, असेही सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले.
राज्यात दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी झाली होती. सीबीएसईमध्ये पिरियाडीकल परीक्षा असतात. मात्र, राज्यातील बोर्डामध्ये तशी पद्धत नाही. त्यामुळे दहावीची परीक्षा आयोजिण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, शिक्षणतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ अधिकाऱयांशी याबाबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
बारावीचा निकाल कसा असेल?
बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्यात येणार आहे. अकरावीमध्ये त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, याविषयी अद्याप स्पष्ट निकष ठरविण्यात आलेले नाहीत. ज्या राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या त्यांच्याशी संपर्क साधून निकाल पत्रकाविषयी माहिती घेण्यात येईल. मागील वर्षी अकरावीची परीक्षा जिल्हा पातळीवर घेण्यात आली आहे. याच्या आधारे ग्रेडींग देण्यात येईल. मात्र, ते कोणत्या स्वरुपात असावेत याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहेत. मागील वर्षी अकरावीत कोणीही अनुत्तीर्ण झाले नव्हते. त्यामुळे बारावीतील सर्व विद्यार्थीही पास होणार आहेत, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
दहावी परीक्षेचे स्वरुप…
- भाषा विषयांचा एक तर इतर विषयांचा एक पेपर
- विद्यार्थ्यांना ग्रेडच्या स्वरुपात मिळणार निकाल
- परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना एन-95 मास्क देणार
- एका खोलीत 10 ते 12 विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था
- परिस्थितीनुसार परीक्षेच्या स्वरुपात बदल शक्य









