तीन पेपर्ससाठी 3500 परीक्षार्थी
प्रतिनिधी / पणजी
गोवा बोर्डाची बारावीची परीक्षा अर्थात शिल्लक राहिलेले तीन पेपर्स आज बुधवार दि. 20 रोजी घेण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 3500 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. गोव्याच्या सीमेपलिकडील विद्यार्थ्यांना तेथेच एकूण 4 परीक्षा केंद्रात सोय करण्यात आली असून त्यांना गोव्यात यायची गरज नाही.
मराठी, पॉलिटीकल सायन्स आणि जॉग्रॉफी असे तीन पेपर्स सलग होणार असून सकाळी 9 वा. ते सुरू होतील. गोव्यात या बारावी परीक्षेकरीता एकूण 17 केंद्रे आहेत तर सुमारे 18000 जणांची नोंदणी परीक्षेसाठी झालेली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांची परीक्षा झाली असून ठराविक विद्यार्थ्यांचे ठराविक पेपर्स शिल्लक आहेत. असे एकूण 3500 विद्यार्थी असून ते वरील तीन पेपर्सची परीक्षा आता देणार आहेत.
गोव्याबाहेरील विद्यार्थ्यांची तेथेच सोय
सातार्डा-महाराष्ट्र येथील महात्मा गांधी हायस्कूल, दोडामार्ग भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल, चोर्लाघाट खानापूर येथील सरकारी हायस्कूल व कारवार माजाळी येथील युनियन हायस्कूल या चार शाळांमध्ये तेथील बारावी विद्यार्थ्यांची (गोव्यात शिकणाऱया) परीक्षा घेण्यास तेथील जिल्हाधिकाऱयांनी मान्यता दिली आहे. सुमारे 80 ते 85 विद्यार्थ्यांची सोय त्यांना जवळ असलेल्या शाळेत गोव्याच्या सीमेपलिकडे करण्यात आली आहे.
आगामी तीन दिवसात ही बारावीची परीक्षा संपणार आहे. त्यानंतर गुरुवार दि. 21 पासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. ती परीक्षा आता पुन्हा एकदा न्यायप्रविष्ट झाली आहे. दरम्यान बारावीची सर्व परीक्षा केंद्रे सॅनिटाईझ करण्यात आली असून सकाळी 9 वा. परीक्षा सुरू होणार असल्याची माहिती गोवा बोर्डाच्या सुत्रांनी दिली.









