अध्याय आठवा
दिव्यावर वेडय़ासारखी झेप घेणाऱया पतंगाला अवधुतानी गुरु केले. दिव्यावर झेप घेतली की राख होणार हे नक्की असताना पतंग दिव्यावर झेपावायचे काही सोडत नाहीत. एव्हढेच नाही तर पुढल्याची राख होत आहे हे पाहूनसुद्धा मागला पतंग दिव्यावर झेपावायचे सोडत नाही. पतंगाचा हा दुर्गुण माणसाने विषयोपभोग घेण्याच्या संदर्भात केव्हाच आत्मसात केला आहे. स्त्रिया व पुरुष दोघेही विषयोपभोग घेण्यासाठी ललचावलेले असतात आणि पतंगाप्रमाणेच माणसेसुद्धा पुढच्याची विषयोपभोगामुळे वाट लागते आहे हे पाहूनसुद्धा विषयोपभोग घेण्यासाठी धडपडण्याचे सोडत नाहीत. अवधूत म्हणतात योग्याने हे वेळीच ओळखावे आणि इतरांना सावध करावे. पतंग दुर्गुणी असूनसुद्धा त्याचा दुर्गुण आपल्यात येऊ नये म्हणून अवधुतानी त्याला गुरु केले.
अवधुतांचा पुढचा गुरु भ्रमर म्हणजे भुंगा आहे. हा भुंगा फुलात शिरतो, पण ते फूल चुरगाळत नाही. आपले कार्य मात्र साधतो. अशी भ्रमराची बुद्धी चांगली असते. भुंग्यातली ही सद्बुद्धी योग्याने आत्मसात करावी. घरोघरी जीव जगवण्यापुरती भिक्षा मागावी गृहस्थ लोकांना त्रास देऊ नये. समर्थ किंवा दुर्बळ असा भेदभाव मनात मुळीच न आणता योगी केवळ प्राणधारणेपुरतीच भिक्षा मागतो. भुंग्याकडून दुसरी गोष्ट शिकायची म्हणजे भ्रमर कमलिनीत शिरून परिमळाला लुब्ध होऊन बसतो.
अस्तमानी कमल मिटते व तेच भ्रमरास बंधन होते! वेळ पडली तर मोठमोठय़ा लाकडी तुळया लीलया पोखरणारा भुंगा सायंकाळ झाली की कमळ मिटल्याने प्रिया दुखावेल म्हणून कोणतीही हालचाल न करता कमळात अडकून पडायला तयार होतो. याचप्रमाणे संन्याशीही जर एकाच ठिकाणी आसक्त होऊन राहिला तर तेच त्याला बंधन होऊन बसते. तो विषयाच्या लोभाला गुंतून पडतो हे लक्षात घेऊन योग्याने एकाच जागी गुंतून पडू नये. त्याने आसक्ती वाढते. तिसरे म्हणजे भुंगा लहानमोठय़ा सर्व फुलातील रस सेवन करतो. भ्रमर जसा सर्व तऱहेच्या फुलांमधून रसरूप सार ग्रहण करतो, त्याप्रमाणे कुशल मुनीने सर्व लहानमोठय़ा शास्त्रातून सार ग्रहण करावे. कोणताही भेदभाव न करता लहानमोठी सर्व प्रकारची शास्त्रे शिकून घ्यावीत. तसेच ज्याप्रमाणे पंडितांचे वचन शिरोधार्ह मानावे, त्याचप्रमाणे सामान्य माणसाने सांगितलेले हिताचे वाक्मय आदराने ऐकावे. पाणी आणि दूध एकत्र झाले तरी ते जसें राजहंसाने निवडून घ्यावे तसाच योगीही सारासारविचारपूर्वक सार-अंश, ग्रहण करतो. जसे मनात पतीबद्दल वाटत असलेल्या प्रेमापोटी कुलवधू सासू सासऱयांना मान देते इतकेच काय नवऱयाच्या नोकराशी सुद्धा आदराने बोलते तसे योग्याने सर्वांभूती भगवद्भाव पहावा हे मुख्य सार आहे. हे महाबाहो यदुराजा अशी ज्याची नि÷ा असेल त्याला स्वप्नातसुद्धा अपाय होत नाही.
या भरलेल्या जगामध्ये जो सारग्राही असतो, तोच योगी होय. याप्रमाणे यदूला अवधूतांनी भ्रमर गुरुची लक्षणे सांगितली. भुंग्याच्या वर्तणुकीवरून तीन धडे घेता येतात पहिला म्हणजे माणसाने कुणालाही दुखवू नये. कुणाचेही मन दुखावले की ईश्वराला दुखावल्यासारखे आहे कारण मन ही ईश्वराची विभूती आहे असे भगवंतांनी गीतेच्या विभूतीयोग या दहाव्या अध्यायात सांगितले आहे. दुसरा धडा असा की, कितीही सशक्त, अधिकारी असलेली व्यक्ती मोहात अडकली की, स्वार्थामुळे दुबळी होते.
मग हा मोह वस्तू, व्यक्ती वा परिस्थितीचा असू शकतो. त्याला त्याबद्दल आसक्ती वाटत असते. स्वार्थापायी लोक त्याला प्रेम असे गोंडस नाव देतात. खरं म्हणजे जिथे प्रेम असते तिथे स्वार्थ नसतो पण जिथे मोह किंवा आसक्ती असते तिथे नक्कीच स्वार्थ असतो. तो साधण्यासाठी लोक स्वतःकडे कमीपणा घेतात. हे सर्व लक्षात घेऊन योग्याने स्वार्थापायी कोठेही गुंतून पडू नये. भुंग्याकडून घ्यायचा तिसरा धडा म्हणजे भुंगा कोणताही भेदभाव न करता सगळय़ा फुलातील मकरंद गोळा करतो. तसेच योग्याने सगळय़ांना समानतेने वागवावे. गुरुच्या मालिकेत अवधुतानी दोन प्रकारच्या माशांना गुरु केले त्याबाबत जाणून घेऊयात पुढील भागात..







