प्रतिनिधी / सातारा :
तब्बल चार वर्षापूर्वी सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजूरी मिळाली. खासदार उदयनराजेंच्या हस्ते त्याचे उद्घाटनही झाले होते. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा नेऊन तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करुन प्लास्टिक वेगळे करण्यात येणार होते. परंतु, हा कचरा काढण्यात आलेल्या तळ्यात एकत्रच टाकला जातो. पालिकेचा जेसीबी सोडून एका नगरसेवकाचा जेसीबी आणि पदाधिकाऱ्यांचा पोकॅलॅन येथे डिझेल जाळत असतो. बंद असलेल्या प्रकल्पावर सुपरव्हायझर मर्जीतला बसवला आहे. त्यामुळे पालिकेचा बायोमायनिंग प्रकल्पच टक्केवारीचे कुरण बनले आहे. ठराविकजणच मिळून टक्केवारी खाऊ, असा प्रकार सध्या सुरू असून, पालिकेत दबक्या आवाजात त्याची चर्चा सुरु आहे.
आरोग्य विभागात बाहेरुन काहीच दिसत नसले तरीही हे टक्केवारीचे कुरणच बनले आहे. अगदी पालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा नेमके काय चालते हे माहिती नसते. तर काहीजण आपल्याच भातावर डाळ ओढून घेण्यात गुंग असतात. असाच प्रकार म्हणजे सातारा शहरात दररोज तयार होणाऱ्या सहा टन कचऱ्यावर घन कचरा प्रकल्प उभा करण्यास चार वर्षापूर्वी मंजूरी मिळून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. त्यावेळी केवळ दोन कोटी 93 लाखाचा हा प्रकल्प टप्याटप्याने वाढत 6 कोटी 40 लाखांवरुन आता तो 19 कोटी 34 लाखांपर्यत गेला आहे.
बिल आले आहे पण सह्या करायलाच अधिकारी धजावेना अशी परिस्थिती सध्या पालिकेत आहे. त्यावेळी कचऱ्याच्या प्रक्रियेकरता उभारण्यात आलेल्या शेडमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणलेल्या मशिन सध्या बंद अवस्थेत आहेत. कचरा तसाच टाकला जातो. तोही लीचडसाठी बनवण्यात आलेल्या तळयात. त्यामुळे काढण्यात आलेली तळी बुजण्याच्या मार्गावर आहेत. आतील खत प्रकल्प हा पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचे समजते. दरम्यान, हा प्रकल्प जेव्हा सुरु होता तेव्हा या प्रकल्पातून तयार करण्यात आलेले खत विक्रीला देण्याऐवजी ते खत तळ्यातच टाकले जात आहे. त्यामुळे खत प्रकल्प आणि तळे काढून पुन्हा बुजवण्याचा प्रकार घडत आहे. तसेच या सगळ्यावर देखरेख करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आल्याचे समजते.