दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्य साकारण्याची तयारी
अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘गुडबाय’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात ती अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत दिसून आली. रश्मिका याचबरोबर ‘ऍनिमल’ आणि ‘मिशन मजनू’ या चित्रपटांमध्ये काम करत आहे. रश्मिकाने आता एका बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास अत्यंत थ्रिलर, ऍडव्हेंचरस आणि रियल राहिला आहे. हा प्रवास भावनांचा रोलर कोस्टर राहिला आहे आणि 5 वर्षांमध्ये एक व्यक्ती म्हणून मी अंतर्मुख झाली आहे. आतापर्यंतच्या माझ्या प्रवासाबद्दल अत्यंत समाधानी असल्याचे तिने म्हटले आहे.

पुष्पा चित्रपटासाठी आम्ही सर्वांनी केलेली मेहनत यशस्वी ठरली. लोकांनी आमच्या चित्रपटाचे कौतुक केल्याने मी स्वतःला सुदैवी मानते. पुष्पाच्या दुसऱया भागालाही लोकांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. मी आतापर्यंत कुठलाच बायोपिक केलेला नाही. एखाद्या दिग्गजाच्या बायोपिकमध्ये स्वतःला पाहण्याची माझी इच्छा आहे. सौंदर्य या अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे. त्यांचे जीवन अत्यंत अद्भूत होते. सौंदर्य यांचे सहकलाकार त्यांचे प्रचंड कौतुक करायचे. याचमुळे संधी मिळाल्यास मी त्यांची व्यक्तिरेखा मोठय़ा पडद्यावर साकारण्यास इच्छुक असल्याचे रश्मिकाने म्हटले आहे.









