बुंदेस्लिगा फुटबॉल : विक्रमवीर लेवान्डोवस्कीचा एकमेव गोल ठरला निर्णायक
बर्लिन
बायर्न म्युनिचने सलग आठव्यांदा बुंदेस्लिगाचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे अजून दोन सामने बाकी असतानाच मंगळवारी वेर्डर बेमेनवर एका गोलने विजय मिळवित जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
बायर्नने एकूण 30 व्या वेळी जर्मन चॅम्पियनशिप मिळवित या स्पर्धेवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. मध्यंतरास दोन मिनिटे असताना लेवान्डोवस्कीने हाफ व्हॉलीवर शानदार गोल नोंदवला आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. मात्र शेवटच्या 11 मिनिटांत बेमेनने जोरदार प्रतिकार करीत आक्रमणे केली तेव्हा बायर्नला बचावासाठी संघर्ष करावा लागला. यावेळी युवा खेळाडू अल्फोन्सो डेव्हिसला दुसऱयांदा पिवळे कार्ड मिळाल्याने त्याला बाहेर जावे लागले होते. पावसात झालेल्या पूर्वार्धातील 45 मिनिटांत ब्रेमेनचा भक्कम बचाव पहावयास मिळाला. हे सत्र संपण्याच्या सुमारास सेंटर बॅक जेरोम बोएटेंगने लेवान्डोवस्कीला उंच पास दिला. त्यावर चेस्टिंग करून चेंडू खाली घेतला शानदार गोल नोंदवला. त्याचा हा लीगमधील या मोसमातील 31 वा गोल होता. कारकिर्दीतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी असून तो सलग पाचव्यांदा सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे. बायर्नचा हा ब्रेमेनवर मिळविलेला सलग 13 वा विजय आहे. 54 व्या मिनिटाला लेवान्डोवस्कीने आणखी एक गोल नोंदवला होता. पण यावेळी त्याला ऑफसाईड ठरविण्यात आल्याने हा गोल रद्द करण्यात आला.
या संघाचे प्रशिक्षक हॅन्सी फ्लिक यांनी पहिल्याच मोसमात बुंदेस्लिगाचे जेतेपद पटकावण्याचा मान मिळविला. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी निको कोव्हॅकनंतर या संघाची सूत्रे स्वीकारली होती. कोरोना व्हायरसच्या ब्रेकनंतरही बायर्नचा ओघ कमी झाला नसल्याचे या सामन्यात दिसून आले. गेल्या महिन्यात जर्मनीत फुटबॉलला पुन्हा प्रारंभ झाल्यानंतर झालेल्या आठही सामन्यात त्यांनी विजय मिळविला आहे. 2014 मध्ये जर्मनीने विश्वचषक जिंकला त्यावेळी फ्लिक संघाचे साहाय्यक प्रशिक्षक होते. त्यांना तिहेरी मुकुट साधण्याची संधी असून 4 जुलै रोजी जर्मन कप अंतिम लढतीत बायर्नचा मुकाबला बायर लिव्हरकुसेनशी होणार आहे. याशिवाय चॅम्पियन्स लीगमध्ये शेवटच्या 16 फेरीतील पहिल्या टप्प्याच्या लढतीत बायर्नने चेल्सीवर 3-0 असा विजय मिळवित आघाडी घेतली आहे. बायर्नच्या थॉमस म्युलरचे हे बुंदेस्लिगाचे नववे जेतेपद असून माजी खेळाडू प्रँक रिबेरीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.









